महाविद्यालयांत सर्वत्र एकांकिकेचीच चर्चा; सादरीकरणावर अखेरचा हात

घरकाम, रंगरंगोटी, सजावट, खरेदी अशा कामांची लगबग सुरू झाली की समजावे दिवाळीचा सण जवळ आला. तसेच महाविद्यालयाच्या नाका-कट्टय़ापासून ते गच्चीपर्यंत विद्यार्थ्यांची धावपळ दिसू लागली की समजावे एकांकिकोंचा सोहळा जवळ आला. अशीच लगबग ‘लोकसत्ता लोकांकिका’ दोन दिवसांवर येऊ न ठेपल्याने मुंबईतील स्पर्धक महाविद्यालयांमध्ये दिसून येत आहे.

एकीकडे मोकळ्या जागेत रंगवला जाणारा सेट, कपडेपटाची तयारी, वाद्यांचा घुमणारा आवाज तर दुसरीकडे व्रतस्थ होऊन संहितेवर काम करणारी भावी रंगकर्मीची फळी. असे काहीसे नाटय़मय वातावरण सध्या प्रत्येक महाविद्यालयात आहे. तालमींना जागा मिळाव्या म्हणून विद्यार्थी शिक्षकांच्या खोलीबाहेर उभे दिसतात, तर काही आपला अपुरा राहिलेला अभ्यास पूर्ण करत जिन्यात बसलेले असतात. पण प्रत्येकाच्या ओठांवर एकच चर्चा असते, लोकांकिकेची.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एकांकिका बसवणे आणि स्पर्धेत सादर करणे हे कोणत्याही उत्सवापेक्षा कमी नसते. ‘सिद्धार्थ महाविद्यालया’तील विद्यार्थी सुमेध उन्हाळकर सांगतो, लोकांकिके त सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात उशीर झाला. पण शेवटच्या काही दिवसांत बरेच काही करायचे आहे. त्यात महाविद्यालयात परीक्षा सुरू असल्याने तालमींसाठी जागा मिळणे कठीण झाले आहे. पण रोज सकाळी एका मोठय़ा वर्गातले साठ बाक उचलून वर्ग रिकामा करतो. तालमीनंतर पुन्हा बाक जागेवर लावले जातात. पण दररोज हे काम आम्ही न कंटाळता, शिस्तीत करतो. परीक्षा झाल्यानंतर मुले तालमीला हजेरी लावत आहे. काम खूप असले तरी कोणी कंटाळत नाही. सेट बनवतानाही एकमेकांना रंग लाव, खोडय़ा कर अशा गमतीजमती करत तालमी सुरू आहेत.

‘लोकांकिका’ आमच्यासाठी महत्त्वाची स्पर्धा असल्याचे ‘महर्षी दयानंद महाविद्यालया’तील विद्यार्थी सांगतात. येथे शिक्षक आणि विद्यार्थी अशा दोन्ही आघाडय़ांवर धावपळ सुरू आहे. तालमीचा हा शेवटचा टप्पा असल्याने प्राचार्यही स्वत:हून वेळ देत आहेत, असे याच महाविद्यालयातील उज्वल कानसकर सांगतो. तालमींप्रमाणेच रंगभूमीमागे कार्यरत असलेल्या मुलांची विशेष गडबड असते. सेट बनवणे, रंगकाम, नाटकाला लागणाऱ्या वस्तू, स्पर्धेच्या दृष्टीने पूर्वनियोजन या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. केवळ सेटच नाही तर प्रकाश, संगीत जास्तीत जास्त कसे दर्जेदार बनवता येईल याकडे आमचे लक्ष असल्याचे उज्वल सांगतो.

नाटक उभे करताना अनेक गोष्टींची व्यवस्था करण्यासाठी नाना क्लृप्त्या कराव्या लागतात. त्याविषयी साठय़े महाविद्यालयातील प्रतीक सावंत सांगतो, एकांकिका करताना प्रत्येक गोष्ट व्यावसायिक नाटकाप्रमाणे विकत आणणे शक्य होत नाही. त्यामुळे घरातल्या सगळ्या गोष्टी या एकांकिकेच्याच झाल्या आहेत. यंदा कपडेपट काहीसा वेगळा असल्याने त्यासाठी थोडी खटाटोप करावी लागली. ज्या कपडय़ांसाठी दहा हजारांहून अधिक पैसे खर्च होणार होते, तेच कपडे मुलांनी एका रात्रीत तयार केले, असे प्रतीक सांगतो.

प्रायोजक 

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकांकिका’ स्पर्धा ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘आयओसीएल’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिके च्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिके त संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.

सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत के वळ एकांकिका आणि एकांकिकाच सुरू आहे. आमची परीक्षा संपल्याने डोक्यात अभ्यासाचा विचारही येत नाही. सध्या घर-दार जे काही आहे ते तालमीमध्येच आहे. या प्रक्रियेत घरच्याचा पाठिंबा हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो आमच्या प्रत्येकाच्या पाठीशी आहे. काही वेळेला घरी येऊ न तालीम करा, असेही पालकांकडून सांगितले जाते. – पूनम सावंत, विद्यार्थिनी, मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स