सहकार भांडारच्या माध्यमातून वस्तू देण्याचा प्रस्ताव धूळ खात
विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हाती पैसे न देण्याच्या राजकारण्यांच्या, तर नव्याने निविदा न मागविण्याचा पालिका आयुक्तांच्या अट्टहासामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थी यंदा दप्तर, खाऊचा डब्बा आणि पाण्याच्या बाटलीपासून वंचितच राहिले आहेत. या वस्तू सहकार भांडारच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागातील अधिकारी करीत होते. परंतु दस्तुरखुद्द आयुक्तांकडून त्यास हिरवा कंदील मिळू शकला नाही. दिवाळीनंतर तरी या वस्तू मिळतील अशी विद्यार्थ्यांना आशा होती. परंतु आता तीही मावळली आहे. पुढच्या वर्षी तरी या वस्तू मिळतील का असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांचे पालक विचारू लागले आहेत.
काही वर्षांपूर्वी पालिका शाळांमधून विद्यार्थ्यांची मोठय़ा संख्येने गळती होत होती. ही गळती रोखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना दप्तर, पाण्याची बाटली, डब्बा, शूज, पायमोजे, कम्पासपेटी, रेनकोट आदी शालोपयोगी २७ वस्तू मोफत देण्याची योजना आखली आणि त्याचा धूमधडाक्यात श्रीगणेशाही केला. गेल्या काही वर्षांपासून या वस्तू विलंबानेच विद्यार्थ्यांच्या हाती पडू लागल्या आहेत. तसेच चढय़ा दराने त्या खरेदी करण्यात येत असल्यामुळे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी त्यास कडाडून विरोध केला. मात्र सत्ताधाऱ्यांच्या संख्याबळामुळे त्यांचे बळ तोकडे पडले, अखेर त्यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली. तसेच या वस्तूंचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र मनसे वगळता अन्य राजकीय पक्षांनी विरोध केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करणे तत्कालीन पालिका आयुक्तांना जमले नाही. विद्यार्थ्यांना सहकार भांडारच्या माध्यमातून या वस्तू देता येतील का याची चाचपणी शिक्षण विभागाने केली. सहकार भांडारच्या अधिकाऱ्यांबरोबर पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या. वस्तूचा दर्जा आणि किंमत निश्चित करून प्रत्येक विद्यार्थ्यांला टोकन द्यायचे आणि टोकनद्वारे विद्यार्थ्यांने सहकार भांडारातून वस्तू घ्यायच्या असे ठरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खरेदीचा हा मार्ग सुकर वाटल्याने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी त्याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांना पाठविला. पण हा प्रस्ताव आयुक्त कार्यालयात धूळ खात पडला आहे. त्यावर कोणताच विचार न झाल्याने यंदा विद्यार्थी दप्तर, डब्बा आणि पाण्याच्या बाटलीपासून वंचित राहण्याची वेळ ओढवली आहे. राजकारणी आणि आयुक्तांच्या द्वंवामध्ये दिवाळीची सुट्टी पडली. सुट्टीनंतर या वस्तू मिळतील अशी विद्यार्थ्यांना आशा होती. परंतु दिवाळीची सरली आणि आता शाळा सुरू झाल्या. पण विद्यार्थ्यांना दप्तर, खाऊचा डब्बा आणि पाण्याची बाटली मिळण्याचे चिन्ह आहे. पुढच्या वर्षी तरी या वस्तू मिळतील ना अशी विचारणा विद्यार्थी शिक्षकांकडे करू लागले आहेत.

*२०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे दप्तर, पाण्याची बाटली आणि खाऊचा डब्बा खरेदी करण्यासाठी    निविदा प्रक्रियेत विलंब झाला. जून उडाजला तरी या वस्तू खरेदीचे चिन्ह दिसत नव्हते. अखेर या वस्तूंचे पैसे विद्यार्थ्यांच्या  बँक खात्यामध्ये जमा करण्याची तयारी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दर्शविली. तसेच त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी  समितीमध्ये सादर केला. विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केलेले पैसे पालक उधळतील. मग विद्यार्थ्यांना वस्तू मिळणार नाही,  असा युक्तिवाद करून सत्ताधाऱ्यांनी प्रस्तावाला विरोध केला. सत्ताधारी शिवसेना -भाजपच्या नगरसेवकांनी वस्तू खरेदी  करण्यासाठी फेरनिविदा मागविण्याचा आग्रह धरला. मात्र आयुक्तांनी फेरनिविदा मागविण्यात फारसे स्वारस्य दाखविले  नाही. काही दिवसांनी विद्यार्थ्यांचा राजकारणी आणि प्रशासनाला विसर पडला.