‘सुंदर अक्षर हाच खरा दागिना’ हा सुविचार शाळेत नेहमीच सांगितला जातो. मात्र तरीही अनेकांचे अक्षर सुधारता सुधरत नाही. असे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाची परीक्षा देणार असतील तर, विषयांच्या अभ्यासासोबत त्यांना सुलेखनाचेही धडे गिरवावे लागणार आहेत. कारण उत्तरपत्रिकेतील अक्षर परीक्षकाला समजले नाही तर विद्यार्थ्यांला शून्य गुण देण्यात येतील, असा अजब नियमच मुंबई विद्यापीठाने बनवला आहे.  
मुंबई विद्यापीठाने तांत्रिकदृष्टय़ा प्रगती करण्यास सुरुवात केली असून त्यांनी उत्तरपत्रिका तपासणीचे कामही ऑनलाइन सुरू केले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अभियांत्रिकीच्या परीक्षांचे मूल्यांकन उत्तरपत्रिका स्कॅन करून करण्यात येणार आहे. या परीक्षांच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून त्या तपासणीचे काम सुरू झाले आहे. हे काम अधिक सोपे व्हावे यासाठी विद्यापीठातील तज्ज्ञांनी एक नियमावली तयार केली असून ही नियमावली म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जणू धोक्याचा इशारा आहे.
या निमवालीनुसार विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका सुवाच्च अक्षरात लिहावी जर परीक्षकाला अक्षर कळले नाही तर शुन्य गुण देण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अक्षर सुधारण्यासाठी सराव करावा लागणार असून तसे न झाल्यास नापासांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय या निमावलीत उत्तरपत्रिकेचे कोणतेही पान कोरे ठेवले तर विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेचा गैरवापर केल्याचे समजेले जाईल. म्हणजे त्याच्यावर कॉपीची तक्रार दाखल केली जाऊ शकते.
विद्यार्थ्यांनी आपली उत्तर पत्रिका केवळ काळय़ा शाईच्या बॉलपेननेच लिहायचीही सक्ती करण्यात आली आहे. इतर शाईच्या पेनाने उत्तरपत्रिका लिहिलेली असेल तर उत्तरपत्रिकेच्या मागील पृष्ठावरील खुणा येतील आणि उत्तरपत्रिका स्कॅनिंग केल्यावर वाचता येणार नाही, असे स्पष्टीकरण याबाबत देण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी जाचक नियमावली
विद्यापीठाने तयार केलेली ही नियमावली निकाल लवकर लागवा यासाठी असली तरी ती विद्यार्थ्यांसाठी जाचक आहे, असे मत ‘युवासेने’चे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी व्यक्त केले. तर विद्यापीठ दरवेळी नवनवीन पद्धती आणते आणि यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होते आहे की नाही याचा विचार करत नाही. विद्यापीठाची स्कॅनिंगपद्धती स्वागतार्ह असली तरी यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असेल तर त्याचा काही फायदा होणार नाही, असे ‘मनविसे’चे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी सांगितले.