|| अक्षय मांडवकर

स्फोटकांच्या मदतीने भुयारीकरणाला राष्ट्रीय उद्यान प्रशासनाचा नकार

बोरिवली-ठाणे दरम्यानचा प्रवास जलद व्हावा यासाठी ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तून जाणाऱ्या प्रस्तावित भुयारी मार्गासाठी स्फोट घडवण्यास राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने नकार दिला आहे. स्फोटांमुळे इथल्या संरक्षित वनक्षेत्र आणि जैवविविधतेला हानी पोहोचू शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे हा मार्ग प्रशस्त करण्याकरिता ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’ला टीबीएम यंत्राने भुयारीकरण करण्याचा महागडा पर्याय स्वीकाराला लागणार आहे.

बोरिवली-ठाणे दरम्यानचा राष्ट्रीय उद्यानातून जाणारा हा ११ किमीचा सहा पदरी मार्ग स्फोटकांच्या मदतीने खोदण्याची परवानगी महामंडळाने उद्यान प्रशासनाकडे मागितली होती. या प्रस्तावाला उद्यान प्रशासनाने लाल कंदील दाखविला आहे.

घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीचा बोजा कमी करण्यासाठी हा मार्ग राष्ट्रीय उद्यानाच्या भूगर्भातून नेण्याचा प्रस्ताव आहे. बोरिवलीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील एकता नगर ते ठाण्याच्या टिकूजिनी-वाडी दरम्यान हा मार्ग असेल. या मार्गामुळे बोरिवली-ठाणे हा सध्या एक तासाचा असलेला प्रवास २० मिनिटांवर येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचे भुयारीकरण कसे करायचे याबाबत सूचना देण्याची विनंती ‘एमएसआरडीसी’ने बंगळूरु येथील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रॉक मॅकेनिझम’ संस्थेला केली होती. स्फोटके वापरून भुयारीकरण केले जावे अशी सूचना संस्थेने केली. मात्र राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने हा प्रस्ताव फेटाळला आहे.

उद्यान प्रशासनाकडून अद्याप उत्तर आले नसल्याचे स्पष्टीकरण ‘एमएसआरडीसी’तील एका अधिकाऱ्याने दिले. तसेच उद्यान प्रशासनाने हा प्रस्ताव फेटाळल्यास टीबीएम यंत्राच्या आधारे भुयारीकरण करावे लागेल. यामुळे प्रकल्प खर्चात अंदाजे ४० टक्के वाढ होण्याची शक्यता या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

राष्ट्रीय उद्यान संरक्षित वनक्षेत्रात येते. येथील जैवविविधता लक्षात घेता स्फोटके वापरून भुयारीकरण करण्यास परवानगी देता येत नाही. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव आम्ही फेटाळला आहे. त्यांना तसे कळविण्यातही आले आहे.    – अन्वर अहमद, मुख्य वनसंरक्षक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान