२५ ज्येष्ठ रुग्णांवर अँजिओप्लास्टी

संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : उपनगरातील रुग्णांचा मोठा भार उचलणाऱ्या शीव रुग्णालयातील हृदयविकार विभागात जवळपास १९० रुग्णांवर उपचार करण्यात आले असून यात ६० हून अधिक रुग्णांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या १९० रुग्णांमध्ये साठ वर्षांंवरील २५ रुग्ण असून उपचारानंतर आता या सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे व यातील बहुतेकांना घरी सोडण्यात आले आहे.

पालिकेच्या शीव, नायर व केईएम रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी करोना रुग्णांवर जिवाची बाजी लावून उपचार करत आहेत. या तिन्ही रुग्णालयातील शेकडो डॉक्टर व परिचारिकांना विलगीकरणात राहावे लागले आहे. एकटय़ा शीव रुग्णालयात शंभरहून अधिक डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांवर विलगीकरणाची वेळ आल्याचे येथील ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. तरीही खासगी रुग्णालये नाकारत असलेल्या हृदयविकाराच्या रुग्णांवर शीव रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जातात, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

शीव रुग्णालयाच्या हृदयविकार विभागात एकूण २८ खाटा आहेत तर अतिदक्षता विभागात १४ खाटा आहेत. करोनाच्या काळातही बाह्य़रुग्ण विभागात रोज २५ ते ३० रुग्ण उपचारासाठी येत असून एरवीच्या तुलनेत हे प्रमाण नक्कीच कमी आहे. गेल्या दोन महिन्यात आमच्या विभागात १९० रुग्णांवर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच पेसमेकर बसविण्यापासून विविध हृदयोपचार करण्यात आल्याचे विभागातील प्राध्यापक डॉ. अजय महाजन यांनी सांगितले. येणारा प्रत्येक रुग्ण हा संशयित करोना रुग्ण म्हणूनच पाहिला जातो. महत्त्वाचे म्हणजे हृदयविकाराच्या सर्व प्रक्रिया आम्ही करोनाचा पोशाख घालूनच करतो, असेही डॉ. महाजन म्हणाले. हृदयविकार शस्त्रक्रिया करताना अ‍ॅनेस्थेशियाच्या डॉ. शकुंतला, आमचे विभागप्रमुख डॉ. नाथानी, डॉ. नवीन, डॉ. मिलिंद फडके, डॉ. अभय तिडके तसेच हृदयशल्यचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. जयंत खांडेकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. करोनाच्या काळातही २५ हून अधिक ज्येष्ठ नागरिकांवर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली.

शीव रुग्णालयातील हृदयविकार विभागात गेली अनेक वर्षे गुंतागुंतीच्या व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जात आहेत. करोनाच्या काळातही येथील सर्व डॉक्टर हृदयविकाराच्या शेकडो रुग्णांवर उपचार करत असून खाजगी रुग्णालयात उपचार नाकारले जात असले तरी शीव रुग्णालयात तुम्हाला सर्वोत्तम उपचार मिळतील याची खात्री बाळगा, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश डॉ. भारमल यांनी सांगितले.