News Flash

अंबानी बंधूंची Z+ सुरक्षा रद्द करा, स्वत:ची सुरक्षा व्यवस्था करु शकतात इतके श्रीमंत आहेत; सुप्रीम कोर्ट म्हणतं…

सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी

संग्रहित ((REUTERS/Adnan Abidi/File Photo))

जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत स्थान असणारे मुकेश अंबानी आणि त्यांचे बंधू अनिल अंबानी यांच्यासहित त्यांच्या कुटुंबाला देण्यात येणारी झेड प्लस सुरक्षा मागे घेण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने मांडलेल्या मतावर नाराजी व्यक्त करत उच्चस्तरीय सुरक्षा ज्यांच्या जीवाला धोका आहे त्यांना दिली जावी, जे त्यासाठी पैसे मोजू शकतात त्यांना नाही असं स्पष्टपणे सांगितलं.

हिमांशू अगरवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने हिमांशू अगरवाल यांची अंबानी बंधूंची झेड प्लस सुरक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळली होती. अंबानी बंधू आपल्या सुरक्षेची व्यवस्था करु शकतात इतके श्रीमंत असताना राज्य सरकार जनतेच्या पैशांवर त्यांना सुरक्षा पुरवत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटलं होतं की, “राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणं राज्य सरकारची जबाबदारी आहे. यामध्ये अशा नागरिकांना सुरक्षा देणंही त्याचा भाग आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या महसूलाचा जीडीपीवरही प्रभाव पडतो. त्यांच्या जीवाला असणारा धोका दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही”.

हिमांशू अगरवाल यांनी आपल्या वकिलामार्फत खंडपीठाला सांगितलं की, कोणताही धोका नसताना किंवा तसा कोणताही पुरावा नसताना एखाद्या खासगी व्यक्तीला झेड प्लस सुरक्षा देणे चुकीचं आहे. दरम्यान अंबानी बंधूंची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी सरकार पुरवत असलेल्या सुरक्षेसाठी अंबानी पैसे मोजत असल्याची माहिती दिली. यावर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी जीवाला धोका असल्याचा समज असून त्यासाठी ठोस कारण असलं पाहिजे असा युक्तिवाद केला.

“जर एखाद्याला आपल्या जीवाला धोका जाणवत असेल आणि खर्च उचलण्याची तयारी असेल तर राज्य सरकार त्याला सुरक्षा पुरवणार का?,” अशी विचारणा यावेळी सुप्रीम कोर्टाने केली. खर्च उचलू शकतात त्यांनाच सुरक्षा दिली जावी याला आमची संमती नाही असं सुप्रीम कोर्टाने यावेळी स्पष्ट सांगितलं.

सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली. मात्र राज्य सरकारला अंबानी कुटुंबाला योग्य ती सुरक्षा पुरवण्यासाठी धोक्याचा आढावा घेण्यास सांगितलं आहे. अंबानी त्यासाठी पैसे भरण्यास तयार आहेत याबाबत आमच्या मनात कोणती शंका नाही असंही सुप्रीम कोर्टाने मुकूल रोहतगी यांना सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 1:04 pm

Web Title: supreme court rejects petition demanding withdraw z plus security to ambani brothers sgy 87
Next Stories
1 “माझ्या मुलाने १५ मिनिटांत करोनावर मात केली”, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2 राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजानं…; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला
3 निकिता हत्याकांड: कंगनानं धर्मांतराविषयी केला दावा; मोदी सरकारकडे केली सन्मानित करण्याची मागणी
Just Now!
X