सुरेश प्रभू यांचे आश्वासन; संरक्षक भिंत बांधणार
प्रवासी सुरक्षेचे कारण देऊन नेरळ-माथेरान ही सेवा रेल्वेने बंद केल्यानंतर उमटलेल्या तीव्र निषेधाची दखल घेत आता किमान अमन लॉज ते माथेरान ही सेवा चालू ठेवण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी घेतला. माथेरानची गाडी चालूच ठेवावी, अशी मागणी करण्यासाठी माथेरानमधून एक शिष्टमंडळ रेल्वेमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. या भेटीदरम्यान रेल्वेमंत्र्यांनी हा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी लवकर करावी, अशा सूचनाही मध्य रेल्वेला केल्या आहेत. विशेष म्हणजे ‘लोकसत्ता’ने या गोष्टीची दखल घेत ही सेवा बंद करण्याला ठाम विरोध केला होता.
नेरळ-माथेरान सेवा ही अत्यंत जुनी सेवा असून त्याचे तंत्रज्ञान कालबाह्य़ झाले आहे. त्यामुळे प्रवासी सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत गेल्या पंधरवडय़ात मध्य रेल्वेने ही सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. या मार्गावर अमन लॉजदरम्यान गाडीचे डबे दोन वेळा घसरल्याचे निमित्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला होता. यासंदर्भात माथेरानमधील शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट मुंबईतही घेतली होती.
याबाबत शुक्रवारी दिल्लीत शिष्टमंडळाने पुन्हा एकदा सुरेश प्रभू यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रेल्वेमंत्र्यांना गाडी बंद करण्याच्या विरोधात छापून आलेल्या सर्व बातम्यांची कात्रणे, ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखाचे कात्रण आदी सर्व गोष्टींसह निवेदनही देण्यात आल्याची माहिती शिष्टमंडळातील सदस्य मनोज खेडकर यांनी दिली. ही रेल्वे कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही रेल्वेमंत्री प्रभू यांनी देत तातडीने अमन लॉज ते माथेरान यांदरम्यानची सेवा सुरू करण्याचे आदेश मध्य रेल्वेला दिले आहेत.
आता यादरम्यान एका ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम मध्य रेल्वे हाती घेणार आहे. ही भिंत ६५० मीटर लांबीची असेल. त्याचप्रमाणे या दोन स्थानकांदरम्यान गाडी चालवण्यासाठी मध्य रेल्वे तीन इंजिने आणि दहा डबे यांचीही तयारी मध्य रेल्वे करत आहे. त्यानंतर लवकरात लवकर ही गाडी सुरू करण्यात येईल, असे मध्य रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले.