दसऱ्याच्या मुहूर्ताला बाजारात उत्साहाचे वातावरण

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोने, नव्या वस्तू तसेच वाहनांची खरेदी करण्याची परंपरा असल्याने गुरूवारी मुंबईच्या सराफा बाजारात ग्राहकांनी सोन्याच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली. मात्र सोन्याची नाणी खरेदी न करता तयार दागिने विकत घेण्यावर ग्राहकांनी भर दिला. तसेच मोबाइल खरेदीही मोठया प्रमाणात झाली.

पूर्वी ग्राहक काही दिवस आधी येऊन दागिने किंवा नाणी किंवा सोन्याची बिस्किटे बनवण्यासाठी सांगत आणि दसऱ्याला न्यायला येत. परंतु आता अशी पूर्व नोंदणीसारखी कल्पना मागे पडत चालली आहे, असे दादर मधील सराफ महेश वैद्य यांनी सांगितले. सोन्याचा भाव वाढल्यामुळे ग्राहक हात आखडता घेऊन खरेदी करत आहेत. पण आगाऊ  नोंदणी न करता थेट दुकानात येऊन सोन्याचे दागिने विकत घेण्याचा कल यंदा वाढला आहे, असे ते म्हणाले.

मुंबईच्या उपनगरातील सराफांच्या दुकानातही सोने खरेदीसाठी मोठी गर्दी होती. विलेपार्ले येथील व्ही.एम.मुसळुणकर ज्वेलर्सचे संचालक सुहास मुसळुणकर म्हणाले की, सोने खरेदीसाठी सकाळ पासूनच ग्राहकांनी प्रचंड गर्दी केलेली होती. सर्वाधिक खरेदी ही सोन्याच्या दागिन्यांची झालेली आहे. ग्राहक तयार दागिने घेत आहेत. तसेच दसऱ्याचा शुभ मुहूर्त साधून लग्नाची खरेदी करणारे ग्राहकही मोठय़ा प्रमाणात आले होते. सोन्याचा भाव वाढला असला तरी देखील दसऱ्याला सोने घेण्याची प्रथा आहे. यंदा आमच्या घरी नात आली आहे तिच्यासाठी कानातले खरेदी केले, असे खरेदीसाठी आलेल्या सुलोचना जोशी यांनी सांगितले.

मोबाइलची विक्री जोरात

सोन्याच्या दागिन्यांबरोबर गुरूवारी दसऱ्याला ग्राहकांनी मोबाइल खरेदीवर भर दिला. अनेक कंपन्यांनी आपापल्या मोबाइलचे नवीन मॉम्डेल दसऱ्याच्या निमित्ताने बाजारात आणले होते. फ्युचर ग्रुप हायपर सिटीच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे सेल्स प्रमुख महेंद्र कुमार यांनी सांगितले की दुपारी बारा वाजेपर्यंत मोबाईलचा ४० टक्के साठा संपला. रेफ्रिजरेटर, एअर कंडीशनर आणि वॉशिंग मशिन घेण्यासाठीही गर्दी होती. वातावरणात उकाडा जाणवत असूनही ग्राहकांनी दुपार पासूनच खरेदीसाठी गर्दी केल्याचे त्यांनी सांगितले. भाटी इलेक्ट्रॉनिक्सचे रमेश भाटी म्हणाले की, ओव्हन, मायक्रोवेव्ह घेण्याकडे ग्राहकांचा कल मागच्या वर्षी पेक्षा कमी झाला आहे. ग्राहक एअर फ्रायर, एअर रोस्ट सारख्या वस्तू घेत आहेत. तसेच जुना टेलिव्हीजन सेट घेऊन नवीन टेलिव्हिजन सेट घेण्याच्या ऑफरसाठीही १२० ग्राहकांकडून नोंदणी होत होती.

जळगावमध्ये २५ कोटींची उलाढाल

सुवर्णनगरी जळगाव येथे गुरूवारी एकाच दिवसात सोनेखरेदीत २५ कोटींची उलाढाल झाली. जळगावातील सोने देशभर प्रसिद्ध असल्याने येथे नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते, परंतु  काही महिन्यांपासून सोने खरेदीत मंदीचे वातावरण होते. मात्र गुरूवारी शहरातील सुवर्ण पेढय़ा गजबजून गेल्या होत्या. शहरातील दीडशेपेक्षा अधिक सुवर्ण पेढय़ांमध्ये साधारणत: २५ कोटी रुपयांची उलाढाल झाली.