अननुभवी सामाजिक गटांकडून कामे करून घेताना अडचणी

मोठय़ा नाल्यांच्या सफाईकडे सर्वपक्षीय बडय़ा नेत्यांनी लक्ष घातले असले तरी शहरभर पसरलेले लहान नाले व गटारे मात्र गाळातच आहेत. कंत्राटदारांनी केलेल्या कोंडीमुळे अखेरच्या क्षणी वॉर्ड अधिकाऱ्यांकडे आलेले हे काम अननुभवी सामाजिक गटांकडून करून घेताना संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला फेस येत आहे. अनेक गटारांमधील गाळ काढण्यासाठी नागरिक नगरसेवकांकडेच धाव घेत असून बाहेर काढलेला गाळ उचलून नेण्यासाठीही विलंब होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.

पाऊस अगदी तोंडावर आलेला असताना मोठय़ा नाल्यावरील अतिक्रमणे तोडून गाळ काढण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची एकीकडे कसरत सुरू आहे. मात्र पावसाळी पाणी वाहून नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे लहान नाले व गटारे दुर्लक्षित राहत आहेत. दरवर्षी कंत्राटदार नेमून या गटारांची व लहान नाल्यांची सफाई केली जाते. या वर्षी मात्र कंत्राटदारांनी पालिकेच्या निविदांना प्रतिसाद न देऊन कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तीन निविदा काढूनही प्रतिसाद आला नसल्याने आयुक्त अजोय मेहता यांनी एप्रिलमध्ये हे काम सामाजिक संस्थांकडून करून घेण्याचे आदेश वॉर्ड अधिकाऱ्यांना दिले.

कामाची सुरुवातच उशिरा झाल्याने व त्यात सामाजिक संस्थांना गटारांची साफसफाई करण्याचा फारसा अनुभव नसल्याने अनेक ठिकाणी गटारात अर्धवट सफाई सुरू आहे. गटारातील काही भागांत सफाई करून पुढचा भाग मात्र तसाच ठेवला गेला. नगरसेवकाला कळवल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा सफाईसाठी माणसे आली. मात्र त्यांनी काढून ठेवलेला गाळ उचलून नेण्यासाठी आम्हालाच पुन्हा तक्रारी कराव्या लागल्या, असे चारकोपमधील रहिवाशाने सांगितले. गटारे पूर्ण स्वच्छच होत नसल्याची तक्रार अनेक उपनगरांमधून सुरू आहे. वडाळा येथेही लहान नाल्यांची सफाई होत नसल्याची तक्रार पालिकेच्या सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केली आहे. बदली झाल्याने धारावी परिसरात नवीन वॉर्ड अधिकारी आला आहे. त्यांना नाल्यांचे- गटारांचे नकाशेच नीट माहिती नसल्याने तसेच नगरसेवकही कामात नीट लक्ष देत नसल्याने गटारांची सफाई वेळेत होत नसल्याचे तृष्णा विश्वासराव म्हणाल्या.

आतापर्यंत हे काम कंत्राटदारांकडून होत असे. नव्याने नेमलेल्या सामाजिक संस्थांकडून काम केले जात असले तरी त्यांना कामाचा अनुभव नसल्याने सतत लक्ष ठेवावे लागते. त्यातच काही वेळा लहान मुलांनाही कामावर आणले जाते. त्यांना आम्ही परत पाठवून देतो, असा अनुभव एका  अधिकाऱ्याने सांगितला.

गटारे व लहान नाले साफ न होण्याची कारणे

  • तीन वेळा निविदा काढूनही कंत्राटदारांनी पालिकेची कोंडी करण्यासाठी एकाही निविदेला प्रतिसाद नाही.
  • अखेर एप्रिलच्या मध्यावर सामाजिक गटांकडून काम करण्यास सुरुवात. त्यामुळे सफाईकामाला उशीर
  • सामाजिक गटांना गटारांची सफाई करून घेण्याचा अनुभव कमी
  • वॉर्डमधील गटारांचे योग्य नकाशे उपलब्ध नसल्यानेही कामात अडथळे
  • वॉर्ड अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही परिणाम.