|| शैलजा तिवले

मुंबईत आठ रुग्णांची नोंद; पाच वर्षांत प्रथमच घडलेला प्रकार

मुंबई : वारंवार होणाऱ्या हवामान बदलाचा परिणाम स्वाइन फ्लूच्या (एच१एन१) प्रसारावरही होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरात जानेवारी महिन्यात स्वाइन फ्लूचे आठ रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे पाच वर्षांत प्रथमच स्वाइन फ्लूचे रुग्ण जानेवारी महिन्यात आढळल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

पावसाळ्यातील दमट वातावरणात डोके वर काढणारा स्वाइन फ्लू नोव्हेंबर महिन्यानंतर काढता पाय घेतो असे सर्वसाधारण चित्र असले तरी यावर्षी जानेवारी महिन्यात स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. शहरात जानेवारीमध्ये ८ रुग्णांना फ्लूची लागण झाली आहे. श्वसनासंबंधी त्रासाच्या तक्रारी घेऊन आलेल्या या रुग्णांवर योग्य उपचार केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

२०१९ मध्ये शहरात ४५१ फ्लूचे रुग्ण आढळले होते आणि पाच जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ च्या तुलनेत रुग्णांची संख्या ९४ टक्क्य़ांनी वाढली तर मृत्यूचे प्रमाण शून्यावरून पाचवर गेले. २०१५ मध्ये शहरात फ्लूची साथ आली होती. त्यावेळी ३०२९ जणांना फ्लूची बाधा झाली होती तर ५२ मृत्यू नोंदले गेले. त्यानंतर एक वर्ष आड करून फ्लूचे प्रमाण वरखाली होत गेले. मात्र पाचही वर्षांमध्ये जानेवारी महिन्यात स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळलेला नव्हता. परंतु, राज्यात २१ फेब्रुवारीपर्यंत ४० स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात मुंबईतील आठ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, स्वाइन फ्लू पूर्वीप्रमाणे कोणत्याही एका हंगामाशी निगडित आजार नाही. चाचण्यांवर भर दिल्याने रुग्णांचे लवकर निदान होत असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

स्वाइन फ्लूची लक्षणे –

तीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे, घशामध्ये खवखव होणे, थकवा आणि काही वेळेस जुलाब किंवा पोटदुखी

 

सततच्या वातावरण बदलामुळे संसर्गजन्य आजारांच्या प्रसारामध्येही आता बदल जाणवत आहे. विविध आजारांचे जिवाणू, विषाणू हे अवतीभवती असतात. परंतु वातावरणानुसार त्यांचा प्रसार आणि प्रादुर्भावाची क्षमता वाढते. पावसाळ्यात हे आजार मोठय़ा प्रमाणावर पसरतात. परंतु वातावरणातील तापमानात सातत्याने होणारे चढउतार यामुळे यांचा प्रसार होण्याचा असा विशिष्ट हंगाम आता पूर्वीप्रमाणे आढळून येत नाही. – डॉ. प्रदीप आवटे, राज्य साथरोग नियंत्रण विभागाचे प्रमुख