दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षांपासून ‘टॅब’ दिले जातील, असे प्रतिपादन युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले. तर राज्यातील सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकांना पर्याय म्हणून ‘टॅब’ कशा पद्धतीने देता येईल, याबाबत बालभारतीवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनेक मुद्दय़ांवर अभ्यास व विचार करावा लागणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांना सांगितले. आदित्य ठाकरे यांनी तावडे यांची विधिमंडळातील दालनात भेट घेऊन त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ‘टॅब’चे सादरीकरण केले.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील विद्यार्थ्यांना टॅब पुरविण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले असून त्यासाठी पावले टाकली जात आहेत. राज्यातील शाळांमध्येही त्यानुसार पावले टाकली जावीत, अशी अपेक्षा ठाकरे यांनी तावडे यांच्याशी बोलताना व्यक्त केली. मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी टॅब पुरविण्यासाठी महापालिकेच्या मदतीने शिवसेनेने योजना आखली आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. आमदार-खासदार निधीतूनही टॅब देता येतील का, याची चाचपणीही करण्यात येत आहे.
केवळ दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘टॅब’ नसून ‘दृक्श्राव्य’ माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे ही आधुनिक पद्धत आहे. ‘ई-लर्निग’च्या दृष्टीने क्रमिक पुस्तकांना पर्याय म्हणून टॅब देता येईल का, तो किती वर्षे वापरात राहू शकतो, बिघडल्यास दुरुस्ती कशी करता येईल, आदी बाबींचा सर्वागीण विचार करण्यात येत असून त्यावर ‘बालभारती’कडून अभ्यास सुरू आहे. केवळ मजकूरच नाही, तर चित्र किंवा दृक्श्राव्य माध्यमातून शिक्षण देणे अधिक योग्य होणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.
पुढील शैक्षणिक वर्षीपासून टॅब देता येईल का, असे विचारता त्याबाबत आत्ताच निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.