गिरीश महाजन यांचे जिल्हाधिकारी व पोलिसांना आदेश
पाण्याचा अपव्यय होत असलेले होळीचे कार्यक्रम, पंचतारांकित हॉटेल्स, क्लबमध्ये होणारे रेनडान्स व होळी समारंभ यांना चाप लावण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील जनतेने दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन होळी साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळून पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाजन यांनी केले आहे.
मुंबईतील पंचतारांकित हॉटेल व अन्य काही ठिकाणी होळीनिमित्ताने रेनडान्स व जल्लोष समारंभांचे आयोजन करम्यात आले आहे. हजारो रुपये शुल्क त्यासाठी आकारण्यात येत असून तेथे पाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. सहार विमानतळ रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलवर आयोजित करण्यात आलेल्या होळीच्या कार्यक्रमात पाण्याचा वापर होणार नाही, यासाठी महाजन यांनी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
यामुळे होळी साजरी करताना पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. याआधीही काही नेत्यांनी यंदा दुष्काळस्थितीमुळे पाण्याविना होळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार यंदा होळीसाठी पाण्याचा कमी वापर होत असल्याचे चित्र दिसत आहे.
पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
पाण्याचा अपव्यय होत असल्यास किंवा समारंभ आयोजित केल्याचे दिसून आल्यास जनतेनेही जिल्हाधिकारी व पोलिस यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन महाजन यांनी केले आहे.