उमाकांत देशपांडे

भाजप हा २०१४ च्या निवडणुकीत राज्यात मोठा भाऊ झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असतानाच शिवसेनेला लोकसभेसाठी २२ तर विधानसभेसाठी निम्म्याहून कमी जागा देण्याची तयारी दाखविली आहे. वरिष्ठ भाजप नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा केली असून दिवाळीनंतर पुढील चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना युती होणारच, असे ठामपणे सांगितले, मात्र शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्वबळावर लढण्याचा शिवसेनेचा निर्णय अद्यापपर्यंत कायम आहे, असे ठणकावले.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केले असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून निवडणुका लढविणार असल्याने शिवसेना-भाजपने युती करण्याशिवाय पर्यायच नाही, अशी भूमिका घेतली आहे. शिवसेना सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करीत असली तरीही ते युतीसाठी तयार होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

भाजपने २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तोडल्याने आणि शिवसेनेचा योग्य सन्मान ठेवत नसल्याने पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. तरीही भाजप नेत्यांनी शिवसेनेशी युती करण्यासाठी पावले टाकली आहेत, असे ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितले.

मात्र शिवसेनेला भाजपबाबत अविश्वास वाटत असून लोकसभेसाठी युती करून विधानसभेसाठी युती तोडली जाईल, अशी शंका वाटत आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्या तरच युतीबाबत विचार करण्याची अट शिवसेनेने भाजपला घातली असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित निवडणुकांना विरोध आहे.

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ही युती राजकीयदृष्टय़ा गरजेची आहे आणि शिवसेना त्यासाठी खचितच तयार होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसेनेची ही भीती दूर करण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वतंत्र घेतल्या, तरी दोन्ही निवडणुकांसाठी युतीची घोषणा आधी करायची, हा मार्ग काढता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुका २०२४ पासून एकत्रित घेण्याची संकल्पना मांडली असून त्या दृष्टीने विचारविनिमय सुरू केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही ग्रामपंचायत ते संसदेपर्यंतच्या सर्व निवडणुका एकाच कालखंडात घेण्याबाबत नुकतेच मत व्यक्त केले. मात्र तरीही राजकीय खेळीनुसार लोकसभा व विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्या प्रश्नांवर लढविल्या जातात, अशी भूमिका घेत एकत्रित निवडणुकांच्या संकल्पनेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोध केला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार लोकसभा निवडणुका पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये तर विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये अपेक्षित आहेत. केवळ पाच महिन्यांच्या कालावधीसाठी भाजप सरकारचा कालावधी कमी होऊ नये, असे फडणवीस यांचे मत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागावाटपातून मार्ग काढला जाईल व युती होईलच, असे स्पष्ट केले. शिवसेनेकडून मात्र भाजपच्या प्रस्तावांना दुजोरा देण्यात आला नाही. मात्र दोन्ही निवडणुकांसाठी युतीचे जागावाटप आधी जाहीर करून निवडणुका मात्र स्वतंत्रपणे घेतल्या जातील, असे फडणवीस यांनी सांगितले.

भाजपला शिवसेनाप्रेमाचे भरते आलेले आहे. त्यामागचे मुखवटे आणि चेहरे आम्ही न्याहाळत आहोत. भाजपकडून २०१४ मध्ये आलेला युतीबाबतचा अनुभव आम्हाला स्मरणात आहे. आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय शिवसेनेने कार्यकारिणीत ठराव करून जाहीर केला आहे. तो अजूनपर्यंत अबाधित आहे.

– संजय राऊत, शिवसेना प्रवक्ते