कर्करोगांच्या गाठीवर प्रभावी उपचारपद्धती

मुंबई :  रेडिएशन थेरपीचे दुष्परिणाम टाळून शरीरातील इतर पेशींना न मारता कर्करोगाच्या पेशींवरच घाव घालण्यासाठी उपयुक्त असलेली प्रोटोन थेरपी ( हॅड्रॉन बीम थेरपी) आता टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. रुग्णालयाच्या खारघर येथील केंद्रामध्ये ह्रेडॉन बीम थेरपी (प्रोटोन) यंत्र आणण्यात आले आहे.

शरीरातील कर्करोगांच्या पेशींनी मारण्यासाठी किंवा त्यांची वाढ थांबविण्यासाठी रेडिएशन थेरपी दिली जाते. यामुळे मात्र शरीरातील इतर पेशीही नष्ट होतात. याचे सर्वाधिक दुष्परिणाम बालकांमध्ये होत असून त्यांच्या शरीरातील स्नायू, हाडे, मेंदू, हृदय यांच्या विकास आणि वाढीमध्ये अडथळे निर्माण होतात.  रेडिएशनमध्ये कमीत कमी डोस देऊन अधिकाधिक कर्करोगांच्या पेशी नष्ट करणे यासाठी प्रोटोन थेरपी विकसित होत आहे. यात कमीत कमी डोस मध्ये गाठीमधील कर्करोगांच्या पेशी नष्ट केल्या जातात आणि तेथील अन्य पेशींवर याचे दुष्परिणाम होत नाहीत. भारतात दरवर्षी ५० हजार बालकांना कर्करोगाची बाधा होते. यातील जवळपास २ हजार बालकांसाठी ही थेरपी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे बालकांसाठी ही थेरपी अत्यंत महत्त्वाची आहे. जगातील ७७ ठिकाणी ही थेरपी उपलब्ध असून आता यात  टाटा मेमोरियल रुग्णालयाचाही समावेश आहे. खारघर येथील केंद्रामध्ये प्रोटोन थेरपी सुरू करण्यासंदर्भात मागील दोन वर्षांंपासून पूर्वतयारी सुरू होती. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये ही थेरपी उपलब्ध करणारे टाटा मेमोरियल हे पहिले केंद्र आहे.

ही उपचारपद्धती खर्चिक मानली जाते. अमेरिकेसारख्या देशामध्ये या उपचाराचे एक चक्र घेण्यासाठी एक ते दीड कोटी रुपयांचा खर्च येतो. त्याचवेळी टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये ही थेरपी आर्थिकदृष्टय़ा उच्च गटापासून वंचित घटकांसाठीही उपलब्ध करण्यात येणार आहे. सप्टेंबर २०२०मध्ये खारघरमधील केंद्रात याचे कार्य वेगाने सुरू होईल, असा विश्वास डॉ.सिद्धार्थ लष्कर यांनी व्यक्त केला.

उपचार शक्य

प्रोटोन थेरपीच्या मदतीने कर्कग्रस्त बालके, मेंदू ,हाडे आणि मऊ उती, डोके आणि मान, हृदय, वृषण येथील कर्करोगावर प्रभावीपणे उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच कर्करोगांच्या गाठींवरील उपचारासाठी उपयुक्त आहे.