उबर टॅक्सीत प्रवास करणाऱ्या परदेशी तरुणीचा विनयभंग करणाऱ्या चालकाला सांताक्रूझ पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली.  शेहबाझ शेख (३२) असे त्याचे नाव आहे. गुन्ह्य़ाची तक्रार पोलिसांत झाल्याचे कळाल्यानंतर तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित तरुणी बुधवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री ११च्या दरम्यान वांद्रे, पाली हिल येथून वर्सोवा येथे जाण्यास निघाली होती. तरुणीच्या मैत्रिणीने तिच्यासाठी उबर टॅक्सी बुक केली. वांद्रय़ाहून निघाल्यानंतर या चालकाने तरुणीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर खड्डे असल्याने मागे बसण्यास अडचण होईल, त्यामुळे पुढच्या आसनावर येऊन बसण्यास चालक सांगू लागला. मात्र तरुणीने त्यास नकार दिला. काही वेळाने चालकाने निर्जन जागा पाहून गाडी थांबवली आणि गाडीच्या मागील काचेवर धूळ साठल्याने काही दिसत नसल्याचा कांगावा करत काच साफ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मागील दरवाजाने तो आत गेला आणि तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने प्रतिकार करत टॅक्सीबाहेर पडून कसेबसे वर्सोव्यातील घर गाठले. तेथे हा प्रकार मैत्रिणीला सांगितला. गुरुवारी हा सर्व प्रकार फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर पोलिसांनी दखल घेऊन त्यांना तक्रार नोंदविण्यास बोलावले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली.