सरलवरील विद्यार्थिसंख्येच्या आधारे शिक्षकांची संख्या ठरवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून आता त्यासाठी १ जानेवारी रोजी असलेली विद्यार्थिसंख्या गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे सरलच्या प्रणालीशी झटापट करत विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची शिक्षकांची धावपळ पुन्हा सुरू झाली आहे. अद्यापही लाखो विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांकच नसल्यामुळे शिक्षकांवर टांगती तलवार कायम आहे. संचमान्यता न झाल्यास फेब्रुवारी महिन्याचे वेतन देण्यात येणार नाही, अशी तंबीही शिक्षकांना देण्यात येत आहे.

शिक्षकांची संचमान्यता म्हणजे विद्यार्थिसंख्येनुसार शिक्षकांची संख्या ठरवण्यासाठी सरलवरील तपशील गृहीत धरण्यात येणार आहेत. त्यासाठी यापूर्वी ३० सप्टेंबपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत सातत्याने वाढवून २३ ऑक्टोबपर्यंत करण्यात आली. मात्र सरल प्रणालीमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी, विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नसणे अशा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत झाली नाही. त्यामुळे या निर्णयाला शिक्षकांकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर आता नव्याने १ जानेवारी रोजीची विद्यार्थिसंख्या गृहीत धरण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. १ जानेवारीला सरल प्रणालीवर जेवढय़ा विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत झाली असेल त्या संख्येनुसार शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. मात्र याबाबत डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात शिक्षकांना सूचना देण्यात आल्यामुळे सुट्टय़ा, स्नेहसंमेलने, सहली सांभाळून विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी शिक्षकांची पुन्हा एकदा पळापळ सुरू झाली आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंदणी करणे, सातत्याने गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती, विद्यार्थी पुढील इयत्तेत गेल्यानंतर त्याची आवश्यक माहिती अद्ययावत करणे, शाळाबाह्य़ म्हणून नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करणे, शिक्षकांची माहिती अद्ययावत करणे हे सर्व काम १ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिक्षकांची ऑनलाइन कामांशी झटापट सुरू झाली आहे.

‘आधार’ आणायचे कुठून?

अद्यापही लाखो विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यात आलेले नाही. शहरी आणि ग्रामीण भागांतील बहुतेक आधार केंद्रे सध्या बंद आहेत. सुरू असलेल्या आधार केंद्रावरही दिवसाला २० ते २५ नागरिकांचेच आधार कार्ड काढले जाते. शाळांनी मागणी करूनही त्यांना विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्यासाठीची सुविधा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सरलमध्ये नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक कुठून आणायचा, हा शिक्षकांसमोर दोन महिन्यांपूर्वी असलेला प्रश्न अद्यापही कायमच आहे.

९० टक्के विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंदणी झाली आहे. माहिती अद्ययावत करण्याबाबत  सूचना देण्यात आल्या आहेत. आधार नसेल तरीही ते विद्यार्थी गृहीत धरून संचमान्यता करण्यात येणार आहे. -गंगाधर मम्हाणे, माध्यमिक शिक्षण संचालक