‘महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषद’ या राज्यस्तरीय शिक्षक संघटनेच्या नऊ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनानिमित्त राज्यभरातील बहुतांश शिक्षकांनी तब्बल आठवडाभराची सुटी टाकत महाबळेश्वरची वाट धरली आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांना सोमवारपासून आठवडाभर अनौपचारिक सुटी मिळणार आहे. अधिवेशनाच्या नावाखाली शिक्षकांचे हिवाळी पर्यटन होत असून विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होणार आहे.
गेल्या वर्षी सिंधुदुर्गला झालेल्या अधिवेशनावरून प्रसिद्धीमाध्यमांतून टीकेची झोड उठवली गेली होती. तरीही पुन्हा एकदा सरकारने अधिवेशनात शाळा बंद ठेवण्यास परवानगी दिली आहे. यंदा नऊ आणि १० जानेवारीला महाबळेश्वरला परिषदेचे अधिवेशन होणार आहे. दरवर्षी या संघटनेच्या अधिवेशनासाठी शिक्षकांना रजा दिली जाते. अधिवेशन दोन दिवसांचे असले तरी प्रत्यक्ष अधिवेशनाचे आणि नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी आणि परतण्यासाठी लागणारे दिवस मिळून तब्बल आठवडाभराची रजा टाकून हजारो शिक्षक अधिवेशनाच्या नावाखाली होणाऱ्या या पर्यटनासाठी गोळा होतात. त्यामुळे, या वर्षीही राज्यातील बहुतांश प्राथमिक शाळा सहा ते ११ जानेवारी दरम्यान बंद राहतील. मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनाला उपस्थित राहवे यासाठी अधिवेशनाची तारीख तीनवरून १० जानेवारीपर्यंत पुढे नेण्यात आली.
राजकीय पक्ष आणि संघटना हे एकमेकांना कसे वापरतात, याचेच हे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने या संबंधात नाराजी व्यक्त करताना दिली. गेल्या वर्षी सिंधुदुर्गला झालेल्या संघटनेच्या अधिवेशनाला केवळ ४० हजार शिक्षक उपस्थित होते. तर मंजूर केल्या गेलेल्या रजा दोन लाखांहून अधिक शिक्षकांच्या होत्या, अशी माहितीही या शिक्षकांनी पुरविली. या सुट्टय़ा नसून रजा आहेत, असे स्पष्टीकरण जरी दिले जात असले तरी संघटनांच्या दबावाखाली अधिकारी या रजा नंतर नोंदवतही नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
शिक्षण हक्क कायद्यामुळे ८०० तास शिकविणे अपेक्षित आहे. परंतु, या अशा रजा देऊन शाळा आठवडाभर बंद राहू लागल्या तर हे उद्दिष्ट कसे काय साध्य होईल, असा सवाल केला जात आहे. त्यामुळे, ही अधिवेशने सुट्टीकाळात घेतली जावी, अशी मागणी प्रामाणिक शिक्षकांकडून केली जात आहे.
या अधिवेशनाला हजेरी लावल्याचे प्रमाणपत्र सादर करून शिक्षक रजा मंजूर करून घेतात. पण, ‘हे प्रमाणपत्र ५०० रुपये भरून घरपोच मिळविता येते. त्यामुळे प्रत्यक्षात काही शिक्षक अधिवेशनाला जातच नाहीत. अधिवेशनाला उपस्थित असलेली एकूण डोकी आणि रजा काढलेल्या शिक्षकांची संख्या पडताळून पाहिली की ही तफावत दिसून येईल.
एक शिक्षक