विधानसभा निवडणूक कामांच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या शिक्षकांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी देण्यात यावी, असा निर्देश निवडणूक आयोगानेच १५ नोव्हेंबर १९९४ रोजी दिला होता, त्यामुळे शिक्षकांनी गुरुवारी कामावर जाऊ नये, असे आवाहन शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केले आहे. या सुटीची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मोते यांनी ठाणे जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळेस निवडणूक आयोगाने दिलेला निर्देश स्पष्ट झाला. त्यानुसार मतदानाच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची गैरहजेरी क्षमापित करून तो दिवस सेवाकाल धरण्याबाबत स्पष्ट केले आहे. यावरून शालेय शिक्षण विभागानेही या निर्णयाला तत्त्वत: मान्यता दिली होती. यामुळे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांना कामावर जाऊ नये असे आवाहन मोते यांनी केले आहे.