रिमझिम का होईना पण दोन चार सरी पाडणारे ढगही विरळ झाल्याने शहराचे तापमान वाढले आहे. बुधवारी सांताक्रूझ येथे कमाल ३२ अंश सें. तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसही उन्हाच्या झळा लागणार आहेत. शनिवारनंतर मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता असली तरी राज्याच्या उर्वरित भागात मात्र कोरडे वातावरण कायम राहील.
उत्तर भागात तसेच दक्षिणेत कर्नाटक, केरळची किनारपट्टी तसेच लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र अरबी समुद्रातील दक्षिण भागात ढग अडल्याने कोकणापर्यंत ढग पोहोचलेले नाहीत. त्यामुळे गेले दोन दिवस तापमापकातील पारा वर चढत आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात कमाल तापमान ३० अंश सें.पर्यंत मर्यादित राहिले होते. मात्र ढगांचे आवरण विरळ होताच तापमान वाढले. सांताक्रूझ येथे बुधवारी कमाल ३२ अंश  सें. तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसही तापमान चढेच राहणार असल्याचा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, सोमवारपासून बुधवापर्यंत सांताक्रूझ येथे एक मिलिमीटर पाऊसही पडलेला नाही. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी सरी आल्या, तर उर्वरित राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शनिवारपासून मुंबईसह कोकणात पावसाच्या सरी पुन्हा येण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी जोरदार वृष्टी होण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर तापमानात काहीसा उतार होऊ शकतो, मात्र कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या इतर भागांत ऑगस्टमध्येच ऑक्टोबरच्या उन्हाचा अनुभव येण्याची शक्यता आहे.

पावसाची तूट अधिक वाढली
मान्सूनचे दिवस कोरडे जात असल्याने सरासरी आणि वास्तविक पावसामधील तूट वाढत जात आहे. बुधवापर्यंत कोकणातील तूट ३२ टक्के, मध्य महाराष्ट्रातील ३७ टक्के, मराठवाडय़ातील ४७ टक्के तर विदर्भातील ८ टक्के झाली होती. गेल्या आठवडय़ात विदर्भात पडलेल्या पावसामुळे नागपूर, अमरावती आदी जिल्ह्य़ांतील सरासरी वाढली. मात्र विदर्भातील या जिल्ह्य़ांचा अपवाद वगळता इतरत्र ७० टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे.

आजारही वाढले
तापमानात होत असलेली वाढ आणि हवेतील बाष्पाचे प्रमाण यामुळे विषाणूसंसर्ग वाढला असून ताप व त्यासोबत खोकला, सर्दी यांची साथ आली आहे. जून, जुलैपेक्षा रुग्णांचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले आहे. साधारणत: पाऊस जाताना सप्टेंबरदरम्यान ही साथ येते. मात्र सध्याचे वातावरण त्याच प्रकारातील असल्याने साथ वाढल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.