स्थानिक संस्था कराची (एलबीटी) वसुली रोडावल्याने ठेकेदारांची देयके अदा करताना अक्षरश घायकुतीला आलेल्या ठाणे महापालिकेने बुधवारी सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांसाठी १२ हजार ५०० रुपयांचे दिवाळी पुर्व सानुग्रह अनुदान जाहीर केले. याशिवाय कंत्राटी कामगारांसाठी ६२५० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे १५ कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून उत्पन्नात घट झाल्यामुळे महिन्याचा खर्च भागविताना रोकड रकमेचा तुटवडा भासत असल्याची कबुली आयुक्त असीम गुप्ता यांनी या वेळी दिली. तसेच राजकीय नेत्यांचा आग्रह असला तरी यापेक्षा अधिक रक्कम देणे आता शक्य नाही, अशी हतबलता व्यक्त करताना डिसेंबर महिन्याच्या अखेरीस शहर विकास विभाग आणि स्थानिक संस्था कराच्या वसुलीत वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.