News Flash

ठाण्यात कुटुंबातील १४ जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या

वडवली मशिदीजवळ राहणाऱ्या हंसील वरेकरने हत्या केल्याची पोलिसांची माहिती

एकाच कुटुंबातील १४ जणांची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील कासारवडवली परिसरात शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे ठाण्यासह महाराष्ट्र हादरून गेला आहे. वडवली मशिदीजवळ राहणा-या हंसील वरेकरने (वय ३५) आपल्या कुटुंबातील १४ जणांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊऩ आत्महत्या केली. मृतांमध्ये सात मुले, सहा महिला व एक पुरुष यांचा समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हंसीलने आपल्या बहिणी आणि भाच्यांसाठी घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण हंसीलच्या घरी मुक्कामाला राहिले. त्यानंतर मध्यरात्री १च्या सुमारास हंसीलने त्याचे आई-वडिल, पत्नी, दोन मुली, बहिणी आणि भाच्यांची निर्घृणपणे हत्या केली आणि स्वतः गळफास घेतला. आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली तेव्हा त्याच्या हातामध्ये चाकू होता. या घटनेत हंसीलची बहिण सुबिया भरमल बचावली असून, तिने पहाटे आरडाओरडा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून ही घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मात्र हंसीलच्या बहिणीकडून याबाबत अधिकृतपणे माहिती मिळू शकेल. सध्या सुबियावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी पहाटे या घटनेबद्दल माहिती मिळाल्यावर पोलीस, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना इतकी गंभीर होती की घटनास्थळी अक्षरशः रक्ताचे थारोळे साचले होते. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
list

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2016 10:15 am

Web Title: thane man allegedly kills 14 of his family commits suicide
टॅग : Thane
Next Stories
1 शाखाप्रमुख कालगुडेवर अनेक गंभीर गुन्हे
2 अनधिकृत रेती उत्खननावर कारवाई
3 कारखानदारी धोक्यात!
Just Now!
X