ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पातील सुमारे २७०० कोटी रुपयांच्या जमा-खर्चाची उद्दिष्टपूर्ती करणे शक्य नाही, अशी स्पष्ट कबुली देत आयुक्त असीम गुप्ता यांनी हा अर्थसंकल्प स्वीकारणे व्यवहार्य नसल्याचे महापौर संजय मोरे यांना कळविले आहे. त्यामुळे महापालिकेत अभूतपूर्व आर्थिक पेच निर्माण निर्माण झाला आहे.
प्रशासनाने तब्बल आठ महिन्यांपूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुमारे ६०० कोटी रुपयांची वाढ करत सर्वसाधारण सभेने गेल्या महिन्यात आयुक्तांकडे या अर्थसंकल्पाचा अंतिम मसुदा सादर केला. मात्र, महापालिकेच्या जमा-खर्चाचे स्रोत लक्षात घेता ही उद्दिष्टपूर्ती शक्य नसल्याचे सांगत आकडय़ांचा फेरआढावा घेण्याची विनंती महापौरांकडे केली आहे. त्यानंतरही २७०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीचा लोकप्रतिनिधींचा आग्रह कायम राहिल्यास राज्य सरकारकडे हा अर्थसंकल्प फेटाळण्यासाठी पाठवावा लागेल, असा अप्रत्यक्ष इशारा आयुक्तांनी नगरसेवकांना दिला.

  अर्थसंकल्प कसा फुगला?
’महापालिका प्रशासनाने फेब्रुवारी २०१४ मध्ये सुमारे २१०० कोटी रुपये जमा-खर्चाचा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर केला.
’स्थायी समितीने त्यामध्ये २५० कोटी रुपयांची भर टाकली आणि सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी धाडला.
’स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून अपेक्षित उत्पन्न जमा होत नसतानाही महापालिकेने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सुमारे ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या कामांना हिरवा कंदील दाखविला.
’विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने अर्थसंकल्पाचा अंतिम मसुदा प्रशासनाकडे सादर झाला नव्हता.
’त्यानंतर थेट २४ नोव्हेंबर २०१४ रोजी महापौरांनी अर्थसंकल्प मंजुरीचा अंतिम ठराव प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला. यामध्ये मूळ अर्थसंकल्पापेक्षा तब्बल ६०० कोटी रुपयांची वाढ करत सुमारे २७०० कोटी रुपयांपर्यंत फुगविण्यात आला.

आयुक्त म्हणतात..
’या अर्थसंकल्पात स्थानिक संस्था कर (एलबीटी)- ७२५ कोटी, शहर विकास विभाग- ४९० कोटी आणि कर्जरूपाने अतिरिक्त २०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट आखून देण्यात आले आहे. मात्र, सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ही उद्दिष्टपूर्ती शक्यच नाही.
’उत्पन्नाची बाजू फारशी बळकट नसताना एवढा खर्च करणे शक्य नाही. उत्पन्नापेक्षा खर्च वाढतोय हे लक्षात घ्या.
’पुरेसा निधी नसल्याने १५ ऑक्टोबरनंतर सर्व कंत्राटदारांची बिले थकविण्यात आली आहेत.