गणरायाचे आगमन खड्डेमुक्त रस्त्यांवरून व्हावे, म्हणून एकीकडे राजकीय पक्षांकडून पालिका प्रशासनांवर दबाव आणला जात असताना सपाट करण्यात आलेल्या रस्त्यांवर खुशाल खड्डे करा, असा ‘संदेश’ शिवसेनेचे नेते ठाण्यातील गणेशमंडळांना देत आहेत. गणेशोत्सवात मंडपांसाठी खुशाल रस्ते खोदा, असे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले. एवढेच नव्हे तर, यासाठी या मंडळांना कोणताही दंड आकारू नका, असेही त्यांनी पालिका प्रशासनाला बजावले.
ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात घेण्यात आला. यावेळी रस्ते अडवून उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांना पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी नियमांची जाणीव करून दिली. त्याचवेळी आमदार एकनाथ शिंदे यांनी मात्र, नियम कसे धाब्यावर बसवायचे, यासाठी मंडळांना ‘प्रोत्साहन’ दिले.  ही मंडळे वर्षांतून एकदाच रस्ते खोदतात. मंडप उभारण्यासाठी दुसरा पर्याय त्यांच्यापुढे नसतो. त्यामुळे त्यांच्याकडून दंड वसूल केला जाऊ नये, अशी भूमिका शिंदे यांनी घेतली.  ठाणे शहरात जागोजागी खड्डे खणून मंडप उभारणाऱ्या मंडळांविरोधात गेल्यावर्षी तत्कालिन आयुक्त आर.ए.राजीव यांनी दंड आकारणी केली होती. राजीव यांची बदली होताच यंदा मंडळे पुन्हा सोकावली आहेत. त्यामुळे या मंडळांनी दिलेल्या अनामत रकमेतून दंडवसुली करण्याचा विचार सध्या पालिका स्तरावर सुरू आहे. मात्र, शिंदे यांनी त्यालाच खो घातला आहे.
इंदुलकरांना मारहाण करणाऱ्या पोलिसाचे समर्थन
ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांना झालेल्या मारहाणीबद्दल नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.एस.शिरतोडे यांची आयुक्तांनी बदली केली आहे. हाच धागा पकडून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सामाजिक कार्यकर्त्यांचा उल्लेख थेट ‘फकीर’ असा केला. काही फकीर मंडळी मीडियाला हाताशी धरून पोलिसांवर दबाव वाढवत आहेत. अशाने पोलिसांचे बदली होणार असेल तर त्यामुळे कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होईल. त्यामुळे शिवसेना पोलिसांच्या पाठीशी आहे, असे सरनाईक म्हणाले.