News Flash

फेरीवाल्यांचे समर्थन करणाऱ्या नाना पाटेकर यांचे आभार : संजय निरुपम

मुंबईतील फेरीवाल्यांवरून मनसे आणि काँग्रेस एकमेकांविरोधात उभे आहेत.

मुंबईतील काँग्रेस नेते संजय निरुपम (संग्रहित छायाचित्र)

मुंबईतील फेरीवाल्यांवरून मनसे आणि काँग्रेसमध्ये वाद पेटला असतानाच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुंबईतील व्हीजेआयटी महाविद्यालयातील कार्यक्रमात त्यांनी फेरीवाल्यांचे समर्थन केले होते. दुसरीकडे त्यांच्या या भूमिकेचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी स्वागत केले आहे. फेरीवाल्यांच्या अडचणी व जीवन जगण्याचा त्यांचा संघर्ष जाणून घेतल्याबद्दल मी नानांचे आभार मानतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस नेते संजय निरूपम आणि मनेसेचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांच्या मारहाणीत मनसेचे पदाधिकारी सुशांत माळवदे हे गंभीर जखमी झाले होते. निरूपम यांनी भडकवल्यामुळेच फेरीवाल्यांनी माळवदे यांना मारहाण केल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चिघळले होते. त्यातच नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांच्या समर्थनात बाजू मांडल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फेरीवाले आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काम करणारच. आपण त्यांची भाकरी हिरावून घेऊ शकत नाही, असे म्हणत फेरीवाले चुकीचे नसल्याचे नानांनी म्हटले होते. यासाठी महापालिका व प्रशासनाचीच चूक असून त्यांनी फेरीवाल्यांना जागा का दिली, याला आपणच जबाबदार असल्याचे ते शुक्रवारी म्हणाले होते.

त्यावर निरूपम यांनी शनिवारी सकाळी ट्विट केले. फेरीवाल्यांच्या अडचणी व जीवन जगण्याचा त्यांचा संघर्ष जाणून घेतल्याबद्दल मी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आभार मानतो, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले. नाना पाटेकर यांच्या या भूमिकेवरून मनसेकडून काय प्रतिक्रिया येते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 1:11 pm

Web Title: thank you to nana patekar for supporting hawkers says sanjay nirupam
Next Stories
1 देवेंद्र फडणवीस कमालीचा माणूस: नाना पाटेकर
2 मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस उलटली, १२ जण जखमी
3 फेरीवाल्यांसाठी लक्ष्मणरेषा
Just Now!
X