देशभरातील लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लष्कराला पाचारण करण्याबाबत एक फेक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मेसेजची गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर अॅक्ट अंतर्गत जे. जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या फेक मेसेजमध्ये मुंबईतल्या काही पोलीस स्टेशनच्या हद्दींची नाव घेण्यात आली आहेत. यात येणाऱ्या भागांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याचं या फेक मेसेजमध्ये म्हटलं आहे. यामध्ये, शिवाजीनगर, देवनार, चेता कॅम्प, वडाळा, मुंब्रा, बेहराम पाडा, नागपाडा, जे. जे. हॉस्पिटल पोलीस स्टेशन या हद्दींचा उल्लेख करण्यात आला आहे.

हे भाग आता पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेले आहेत. त्यासाठी पोलिसांनी या भागांमध्ये लष्कराला पाचारण केले आहे. त्यामुळे यापुढे लष्करच या भागात गस्त घालणार आहे. लष्कराचे सैनिक या भागात नागरिक फिरताना दिसल्यास लाठी चार्ज करतील, पॅलेट गनचा वापर करतील. त्यामुळे घरातून बाहेर निघणं आणि उगाचच इकडे तिकडे भटकणं त्वरीत बंद करा, असं या फेक मेसेजमध्ये म्हटलं आहे.

हा फेक मेसेज असल्याने तो फॉरवर्ड न करण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.