विकासकधार्जिणी भूमिका घेत असल्याचा निवडणूक अधिकाऱ्यावर आरोप

जुहू येथील प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी झुकते माप दिल्याप्रकरणी चौकशी सुरू असतानाच आता प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्याने विकासकाला मदत होईल अशी भूमिका घेतल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपाची विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी दखल घेतली असून याबाबत माहिती मागविली आहे.

प्रेमनगर झोपु योजना मे. सिगिशिया कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत राबविली जात आहे. या झोपु सहकारी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी आर. एन. हळदे यांनी ११०० मतदारांची यादी जारी केली. एकदा निवडणूक यादी अंतिम झाल्यानंतर त्याबद्दल काहीही आक्षेप आले तरी त्याची दखल घेतली गेली नाही, असा रहिवाशांचा आरोप आहे. विकासकाच्या मर्जीतील सदस्यांनी आपले पॅनेल उभे केले असून त्याविरोधात रहिवाशांचे पॅनेल आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक अधिकारी हळदे यांनी उमेदवारांची अंतिम यादी जारी केली. मात्र त्यानंतर आक्षेप आल्याचा दावा करीत फक्त रहिवाशांच्या पॅनेलच्या सहा उमेदवारांनी आक्षेप घेतला. याविरोधात आता या सदस्यांनी सहनिबंधक बाजीराव शिंदे यांच्याकडे अपील केले आहे.

निवडणूक नियम २००२ नुसार, ज्या उमेदवारांना तीन मुले आहेत ते अपात्र होतात. याबाबत उमेदवार पडताळणी होण्याआधी आक्षेप घेऊनही हळदे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिशिष्ट दोन आणि मतदार यादीत वेगवेगळे नाव असतानाही विकासकाच्या मर्जीतील उमेदवारांना अपात्र करण्याबाबत ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रेमनगर स्थानिक रहिवाशी संघाचे अध्यक्ष विजय मेंगाने यांनी केला आहे.

हा प्रकल्प आरक्षित भूखंडावर उभा आहे. हा भूखंड नर्सिग शाळा आणि इतर सुविधांसाठी पालिकेने एका खासगी भूखंडधारकाकडून संपादित केला. या भूखंडाचा अन्य वापर करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट केले आहे. या भूखंडावर असलेल्या झोपडीधारकांची पर्यायी व्यवस्था करावी, असेही नमूद असताना त्याकडे दुर्लक्ष करून ही योजना लादली जात आहे. माजी अधिकारी विश्वास पाटील यांच्या काळातील वादग्रस्त ३३ प्रकरणांमध्ये हेही एक प्रकरण आहे, याकडे या योजनेला सुरुवातीपासून विरोध करणारे भाजपचे राजेश मेहता यांनी लक्ष वेधले.

निवडणूक असते तेव्हा दोन गट असतात. दोन्ही गटांकडून परस्परांवर आरोप केले जातात. आपण कोणालाही अनुकूल भूमिका घेतलेली नाही.

– आर. एन. हळदे, उपनिबंधक व निवडणूक अधिकारी

प्रेमनगर झोपु योजनेंतर्गत निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकाराच्या तक्रारींची निश्चितच दखल घेतली जाईल. आपण याप्रकरणी माहिती घेऊ आणि योग्य ती कारवाई करू.

– दीपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपु प्राधिकरण.