13 July 2020

News Flash

नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे

नाणार येथे तेल शुद्धीकरण प्रकल्पाची घोषणा तत्कालीन भाजप सरकारने केल्यानंतर सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने त्यास विरोध केला होता.

मुंबई : नाणार येथे तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याविरोधात आंदोलन करणाऱ्या ७२ जणांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिला.

नाणार येथे तेल शुद्धीकरण प्रकल्पाची घोषणा तत्कालीन भाजप सरकारने केल्यानंतर सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने त्यास विरोध केला होता. स्थानिकांचा या प्रकल्पास विरोध असल्याने प्रकल्प लादू नये, अशी भूमिका घेत स्थानिक आंदोलकांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. लोकसभा निवडणुकीआधी युती जाहीर करताना नाणार प्रकल्प बासनात गुंडाळण्याची अट शिवसेनेने घातली होती. नाणारमध्ये शिवसेनेचा मेळावा घेऊन प्रकल्प रद्द करत असल्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती. मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रविवारी आरे कारशेडसाठी झाडे तोडण्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर नाणारविरोधी आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्यात यावेत, अशी मागणी पुढे आली. नाणारसंदर्भात आमदार राजन साळवी यांच्यासह ३३ जण, राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव यांच्यासह १६ जणांविरोधात पुतळा जाळल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. अशोक वालम यांच्यासह आंदोलनात सहभागी २३ जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी प्रशासनाला दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 2:35 am

Web Title: the crime behind the nanar agitators akp 94
Next Stories
1 पाच दोषींची फाशी कायम
2 पाच हजारांत शाळा चालवा!
3 तीन दिवसांत पावसाची शक्यता
Just Now!
X