माझ्याविरोधात षडयंत्रण रचण्यात आले हेच वास्तव आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ विचारवंत आनंद तेलतुंबडे यांनी दिली. भीमा कोरेगाव प्रकरणाशी आणि एल्गार आणि परिषदेशी माझा काहीही संबंध नाही. मला या सगळ्या गोष्टींमध्ये गोवण्यात आलं. एल्गार परिषदेबाबत बी. जी. कोळसे पाटील आणि पी. बी. सावंत ओरडून सांगत होते आम्ही त्याचे सूत्रधार आहोत. त्याच्याशी तेलतुंबडे आणि इतरांचा संबंध नाही असे ते सांगत होते मात्र यामध्ये मला गोवण्यात आलं. मी गोव्यात होतो त्यावेळी एल्गार परिषदेसंदर्भात मला कोळसे पाटील आणि सावंत या दोघांचाही मला फोन आला होता. आम्ही या संदर्भात एक बैठक ठेवली आहे त्याला तुम्ही या. मात्र मला माझ्या कामाचा व्याप होता म्हणून मी त्यांना नम्रपणे नकार दिला. इतक्या सगळ्या गोष्टी उघड असताना माझं नाव या सगळ्या प्रकारांमध्ये गोवण्यात आलं असं तेलतुंबडे यांनी म्हटलं आहे. मुंबईतील पत्रकार संघात त्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यात ते बोलत होते.

तुमच्या विरोधात हे षडयंत्रण कोणी रचलं असं तुमचं म्हणणं आहे? त्याबद्दल काय सांगाल असं विचारलं असता, मी कुणाचंही नाव घेणार नाही. मात्र माझ्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं. मला हे सांगता येणार नाही, मला विचाराल तर मी Look at The Sky इतकंच म्हणेन. नेमकं सांगता येणार नाही मात्र तर षडयंत्र आहे हे नक्की. अनुपमा राव यांनीही बरीच पुस्तकं लिहिली आहेत त्यांचंही नाव गोवण्यात आलं असं तेलतुंबडे यांनी म्हटलं आहे. माझी पॅरीस टूर नक्षलींनी आयोजित केली असाही आरोप केला गेला तोही निखालस खोटा आहे याचे माझ्याकडे पुरावे आहेत असेही तेलतुंबडे यांनी म्हटलं आहे.

यावेळीही त्यांनी शहरी नक्षलवादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र शहरी नक्षलवाद असा काही प्रकार अस्तित्त्वात नाही. माओवाद किंवा नक्षलवाद हा खेड्यातच रुजलेला होता असेही तेलतुंबडे यांनी म्हटले आहे.