संदीप आचार्य
मुंबई : यापूर्वी आरोग्य विभागाने वेळोवेळी समिती नेमून उपचारांच्या सुविधापासून करोनासाठीच्या वेगवेगळ्या चाचण्यांचे दर कमी केले आहेत. आता करोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दरही कमी करण्यात आले आहेत. यापुढे सिटी स्कॅनसाठी २००० रुपये ते ३००० रुपयांपेक्षा एक रुपयाही कोणत्याही रुग्णालयात अथवा सिटी स्कॅन केंद्रात आकारता येणार नाही.

महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले असून रोज सुमारे २० ते २४ हजार रुग्ण आढळत आहेत. यातील बहुतेक रुग्णांना छातीतील संसर्ग व न्युमोनियासाठी सिटी स्कॅन काढण्यासाठी डॉक्टरांकडून सांगितले जात असून या सिटी स्कॅनसाठी रुग्णांना किमान साडेतीन हजार ते सात हजार रुपये मोजावे लागतात. याबाबत लोकप्रतिनिधी तसेच रुग्णांचेही अनेक आक्षेप होते. ते लक्षात घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

या समितीत शिव रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. अनघा जोशी, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे व जे. जे. रुग्णालय अधिष्ठाता यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. एका आठवड्यात या समितीने सिटी स्कॅनसाठीचे सुधारित दर जाहीर करणे अपेक्षित होते असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यानुसार डॉ. शिंदे यांच्या समितीने १६ स्लाईस सिटी स्कॅनसाठी २००० रुपये दर निश्चित केला आहे. याशिवाय १६ ते ६४ स्लाईस क्षमतेच्या मशीनद्वारे केलेल्या सिटी स्कॅनसाठी २५०० रुपये तर ६४ स्लाईससाठी ३००० दर निश्चित केला आहे. याबाबतचा आदेश गुरुवारी आरोग्य विभागाने जारी केला असून यासाठी सिटी स्कॅन सुविधा असलेल्या रुग्णालये व केंद्रांबरोबर समितीने सखोल चर्चा केली होती.

यापूर्वी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्यमंत्री राजेश टोपे व डॉ. सुधाकर शिंदे यांनी पुढाकार घेत खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड ताब्यात घेण्याचा आदेश जारी केला होता. तसेच खासगी रुग्णालयातील अवाजवी दर आकारणीवर नियंत्रण आणून बेडसाठी तसेच उपचारासाठीचे दर निश्चित केले होते. याशिवाय करोना चाचणीचे दर कमी करून ते ४५०० रुपयांवरून १२०० रुपये एवढे कमी केले तसेच मास्क व सॅनिटाइजरचे दरही येत्या काही दिवसात कमी होणार असून त्या पूर्वीच सिटी स्कॅनचे दर रुग्णांसाठी कमी झाले आहेत.