19 September 2018

News Flash

मुंबईची कूळकथा : डहाणू : प्राचीन धेनूकाकट?

कार्ले लेणींमध्ये एकूण ३७ दानलेखांमध्ये १७ ठिकाणी धेनूकाकट या गावाचा उल्लेख येतो.

(संग्रहित छायाचित्र)

चिंचणी आणि डहाणूची ऐतिहासिकता कशी सिद्ध होते ते आपण तिथे सापडलेल्या ताम्रपत्रांवरून पाहिलेच. ताम्रपत्रांमध्ये असलेल्या नोंदी या प्रत्यक्ष पुरातत्त्वीय पुराव्यांशी जोडल्या गेल्या तर ते अधिक उत्तम असेल. म्हणून मग आपण पुराव्यांच्या शोधात प्रवास सुरू करतो त्या वेळेस आपण धेनूकाकटपर्यंत पोहोचतो. लोणावळ्याजवळील कार्ले येथे सर्वाधिक तर नाशिक आणि कान्हेरी येथे मोजकाच पण धेनूकाकटचा उल्लेख सापडतो. ज्या धेनूकाकटचा हा उल्लेख आहे, ते आपल्या महामुंबईतील डहाणूच असावे, इथपर्यंत हा प्रवास आता येऊन पोहोचला आहे.

कार्ले लेणींमध्ये एकूण ३७ दानलेखांमध्ये १७ ठिकाणी धेनूकाकट या गावाचा उल्लेख येतो. अनेक पुरातत्त्वज्ञ गेली दोनशे वर्षे या धेनूकाकटचा शोध घेत आहेत. फर्गसन् आणि बर्जेस, दामोदर धर्मानंद कोसंबी, सॅम्युअल लाऊल्चली यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या अभ्यासकांपर्यंत अनेकांनी धेनूकाकटचा आपापल्या परीने शोध घेतला. सुरुवातीला तज्ज्ञांना असे वाटले की, आंध्र प्रदेशात कृष्णा नदीकाठच्या अमरावती परिसरातील धरणीकोट किंवा धरणीकोटा म्हणजेच प्राचीन धेनूकाकट असावे. असे वाटणाऱ्या तज्ज्ञांमध्ये  जेम्स बर्जेस आणि भगवानलाल इंद्रजी यांचा समावेश होता. मात्र दान करण्यासाठी एवढय़ा लांबून कुणी कार्ले येथे का येईल, या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळत नाही.

HOT DEALS
  • Apple iPhone SE 32 GB Gold
    ₹ 25000 MRP ₹ 26000 -4%
  • Sony Xperia XZs G8232 64 GB (Warm Silver)
    ₹ 34999 MRP ₹ 51990 -33%
    ₹3500 Cashback

तर्कशास्त्राचा आधार घेता मात्र एका गोष्टीपुरती स्पष्ट होते ती म्हणजे धेनूकाकट ही व्यापाऱ्यांची वस्ती होती, त्यामुळे ती व्यापारी मार्गावरच असली पाहिजे. आजवर अभ्यासामध्ये असे लक्षात आले आहे की, सर्वच्या सर्व लेणी या व्यापारी मार्गावरच खोदण्यात आल्या आहेत. दामोदर कोसंबी यांनीही असाच युक्तिवाद केला होता.

बौद्ध आणि जैन या दोन्ही नागर धर्माचा प्रवास व्यापाराशी हातात हात घालूनच झाल्याचा इतिहास आहे. धेनूकाकटच्या या शोधामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला मदत करतात. शक क्षत्रप नहापण याचा जावई ऋषभदत्त याने त्याचा पुत्र मितदेवनक याची नेमणूक महसूल वसुलीसाठी धेनूकाकट या गावात केली असावी, असे म्हणण्यास वाव आहे. कार्ले लेणीतील दानलेखामध्ये मितदेवनकचा हा धेनूकाकटचा रहिवासी असल्याचा उल्लेख येतो. या परिसरावर शक क्षत्रपांचे राज्य होते. इथेच झालेल्या लढाईमध्ये सातवाहनांनी क्षत्रपांचा पराभव केल्याचा उल्लेख इतिहासात आहे. कार्ले लेणींना दान देणारे व धेनूकाकटमध्ये राहणारे बहुतांश यवन होते. यवन म्हणजे मुस्लीम नव्हे तर देशाबाहेरून आलेले कुणीही. ग्रीक व रोमन यांचा उल्लेखही यवन म्हणूनच होत असे. कार्ले येथील या दान लेखांमध्ये येणारी यवन व्यापाऱ्यांची नावे सिंहध्वज, धम्मधय, कुलयखन, धम्मा, यसवधन अशी आहेत. यातील बहुसंख्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला असावा, असे त्यांच्या नावातील धम्म या शब्दावरून लक्षात येते. धेनूकाकट ही व्यापारी वस्तीच असावी कारण या यवनांचे व्यवसाय अत्तरविक्रेता म्हणजेच गंधक, वैद्य, वढकी म्हणजे सुतार असे वेगवेगळे आहेत, असे लक्षात येते. त्यामुळे धेनूकाकट हे तत्कालीन समृद्ध व्यापारी नगर असावे. त्या गावातील व्यापारी संघटनेच्या नावाचा उल्लेखही एका दानलेखामध्ये कार्ले येथे आहे.

कार्लेच्या खालच्या बाजूस कर्जतजवळ कोंढाणे, तर वरच्या बाजूस जवळच भाजे बेडसे अशी लेणी आहेत. थोडे पुढे गेल्यावर जुन्नरची सर्वात मोठी बाजारपेठही आहे. जुन्नर हे तत्कालीन सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते त्यामुळे काही तज्ज्ञांच्या मते जुन्नरच धेनूकाकट असावे. त्यासाठी त्यांनी काही शिलालेखांमध्ये आलेले ओमेनोगर, पुमेहनकट असे शब्द बाजूला काढून भाषाशास्त्रातील अपभ्रंशांच्या आधारे जुन्नर हेच धेनूकाकट आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पटणारा नाही. दामोदर कोसंबी यांनी काल्र्याच्या जवळ असलेल्या गावांपकी अर्वाचीन देवघर हे गाव असावे, असे गृहीतक मांडले. त्यासाठी पिढय़ान्पिढय़ा  वापरल्या जाणाऱ्या सांस्कृतिक स्मृतीच्या थिअरीचाही वापर केला. मात्र त्यातही समाधानकारक उत्तर नाही मिळाले. मात्र गेल्या काही वर्षांपासून डहाणू दहाणुका नदीकिनारी वसलेले डहाणू म्हणजे धेनूकाकट असे गृहीतक पुढे आले आहे. डॉ. श्रीकांत प्रधान यांनी त्यावर सविस्तर लिहिलेले आहे. व्यापारी यवनांची वस्ती प्रामुख्याने समुद्रकिनाऱ्यावर असावी, कारण प्रमुख व्यापार समुद्रमाग्रे चालायचा. तेही समुद्रमाग्रेच आले होते. ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रअन सी’मध्ये या व्यापाऱ्यांसाठीच्या मार्गदर्शक पुस्तिकेत येणारा व्यापारी बंदराचा उल्लेख डहाणूशी जुळणारा आहे. शिवाय त्या काळी दहाणुका नदीचा उल्लेख येतो. तिच्या अस्तित्वाचा पुरावा शकक्षत्रपांच्या लेणींमध्ये शिलालेखातही सापडतो. नदीजवळील प्रांतास नदीवरून कट हे उपपद लावले जात असे. त्यावरून दहानुका, दहानुका कट व धेनूकाकट असे रूपांतर झालेले असण्याची शक्यता प्रधान व्यक्त करतात. बाकी व्यापारी बंदर असल्याचे पुरावे तर यापूर्वी सापडलेलेच आहेत. हे बंदर शकक्षत्रपचांच्याच ताब्यात होते, हेही ऐतिहासिक नोंदीवरून ताडता येते त्यामुळे प्राचीन धेनूकाकट अर्वाचीन डहाणूच असावे, या मतापर्यंत आताचा शोध येऊन ठेपला आहे.

vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab

First Published on August 29, 2018 3:25 am

Web Title: the myth of mumbai