वाढत्या कर्जामुळे त्रस्त झालेल्या बँकांसाठी आर्थिक सुधारणांच्या पुढील टप्प्याची अंमलबजावणी लवकरच लागू करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. मात्र यासाठी नेमक्या काय उपाययोजना करण्यात येणार, याबाबत त्यांनी गुप्तता पाळली.
भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर अनेक आर्थिक सुधारणा राबवण्यात आल्या. त्यामध्ये बँकांचा समावेश आहे. बँकांची अर्थिक स्थिती आणखी भक्कम होण्यासाठी सुधारणांचा पुढचा टप्पा लवकरच राबवण्यात येईल, असे सांगून जेटली यांनी याबाबत अर्थसंकल्पात उपाययोजना करण्याचे संकेत दिले. ‘सीएनएन एशिया बिझिनेस फोरम’च्या परिषदेत ते बोलत होते. देशातील करप्रणाली स्थिर अािण विश्वासार्ह राखण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे सांगून जेटली म्हणाले, अप्रत्यक्ष कर सुधारणांबाबत वस्तू व सेवा कर हे मोठे माध्यम आहे.
मनमोहन सिंग यांना उत्तर
अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी उत्तम कामगिरी केली, अशा शब्दांत जेटली यांनी त्यांचे कौतुक केले. मात्र देशाचे पंतपधान होताच सिंग यांनी आर्थिक सुधारणा राबविण्याचे धोरण सोडून दिले, अशी टीका जेटली यांनी केली. मुंबईत शनिवारी मेक इन इंडिया सप्ताहाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर मनमोहन सिंग यांनी टीका केली होती. त्यास जेटली यांनी उत्तर दिले.