|| नीलेश अडसूळ

भिंत कोसळली, दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती

मुंबई : दादर-धारावीला जोडणाऱ्या शाहूनगर नाल्याच्या संरक्षण भिंतीची पडझड झाली असून तिचा उरलेला भागही कोसळण्याच्या मार्गावर आहे. तसेच नाल्यातील दरुगधीचा परिणाम रहिवाशांच्या आरोग्यावर होतो आहे. नाल्याच्या दुरवस्थेबाबत स्थानिकांनी वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

तीन हजार मीटर इतक्या लांबीचा हा नाला माटुंगा- धारावीच्या मध्यवर्ती असलेल्या शाहूनगर परिसरातून माहीमच्या दिशेने जातो. या नाल्याच्या दोन्ही बाजूला चाळी आणि इमारती असल्याने दिवसभर रहदारी सुरू असते. तसेच लहान मुलांचा वावर असतो. अरुंद रस्ता, वाहनांची ये-जा, त्यात संरक्षण भिंत नसल्याने लहान मुले नाल्यात पडून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अनेक लहान-मोठे व्यापारी, व्यावसायिक या नाल्यात कचरा टाकतात. त्यामुळे नाल्याच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात दरुगधी असते. संरक्षण भिंत उभारणीसाठी गेले वर्षभर नागरिक पाठपुरावा करत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीही याकरिता प्रभाग समिती गेले सहा महिने पाठपुरावा करत आहेत. परंतु पालिकेकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. पालिका इथे कुठली दुर्घटना होण्याची वाट पाहात आहे का, असा सवाल एका रहिवाशाने संतप्त होऊन केला. पालिकेने लवकरात लवकर नाल्याची संरक्षक भिंत बांधून द्यावी आणि नाल्यावर फायबर शेड (आच्छादन कवच) बांधावे. जेणेकरून त्यात कचरा टाकला जाणार नाही आणि दरुगधीपासून सुटका होईल, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. नाल्यालगतच्या भिंतीकरिता निविदा काढण्यात आल्या आहेत, मात्र त्याचे काम कधी सुरू होईल हे समजू शकले नाही.

पावसाळ्यात बिकट परिस्थिती

पावसाळ्यापूर्वी भिंतीचे काम पूर्ण झाले नाही तर अतिवृष्टीच्या काळात नाल्यालगतचा पाणी जमून आसपासच्या इमारतींना आणि चाळींना धोका संभवू शकतो. तसेच नाल्यातील मैला आणि सांडपाणी चाळींमध्ये शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाल्याची जबाबदारी पर्जन्य जलवाहिनी विभागाकडे येते. आम्ही पाठपुरावा करत आहोत. नाल्यालगत भिंत बांधण्यासाठीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. प्रत्यक्ष काम कधी सुरू होईल, हे तो विभागच सांगू शकेल.

– किरण दिघावकर, सहआयुक्त, जी उत्तर विभाग