पालिकेत सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा मागणी

धनधांडग्यांच्या ताब्यात असलेल्या रेसकोर्सवर मुंबईकरांसाठी ‘थिम पार्क’ उभारण्यात यावे, अशी मागणी गेली काही वर्षे शिवसेनेकडून होत असली तरी राज्यात सत्तेत असूनही गेल्या अडीच वर्षांत त्याला मान्यता मिळविण्यात शिवसेना अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर शिवसेनेने पुन्हा एकदा ‘थिम पार्क’चा विषय लावून धरला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला फारशी किंमत देण्यात येत नसल्यामुळे या मुद्दय़ावरून सेना-भाजपमध्ये आगामी काळात पुन्हा जुंपणार असल्याचे चित्र आहे.

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सचा सुमारे २२२ एकरचा भूखंड ‘रॉयल वेस्टर्न टर्फ क्लब’ यांना ९९ वर्षांच्या भाडय़ाने देण्यात आला होता. हा भाडेपट्टय़ाचा करार ३१ मे २०१३ रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर ‘रॉयल वेस्टर्न टर्फ क्लब’ने भाडेकरार नुतनीकरणाची मागणी महापालिकेकडे केली असून शिवसेनेने त्याला विरोध केला होता. यावेळी या भूखंडावर केवळ श्रीमंतांसाठी अश्वशर्यती न होता तो मुंबईकरांसाठी खुला करून तेथे ‘थिम पार्क’ उभारण्याची भूमिका शिवसेनेने घेतली होती.

या वादात गेली चार वर्षे कोणताही भाडेकरार न होता भूखंड रॉयल क्लबच्या ताब्यात असून पालिकेत पुन्हा सत्तेवर आलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा ‘थिम पार्क’साठी प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेत यासाठी ठराव करून तो राज्य शासनाकडे पाठविण्याचे संकेत सभागृहनेते यशवंत जाधव यांनी दिले आहेत तर सेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी मुंबईत मोठय़ा प्रमाणात सिमेंटचे जंगल उभे होत असताना मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी ‘थिम पार्कला’ मान्यता देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

शिवसेनेच्या मागणीकडे भाजपचे दुर्लक्ष

रेसकोर्सच्या एकूण जागेपैकी ७० टक्के जागा ही राज्य शासनाची असून ३० टक्के भूखंड हा पालिकेच्या मालकीचा आहे. राज्य शासनाच्या परवानगीशिवाय येथे थिम पार्क उभारणे शक्य नाही. तत्कालीन आघाडी शासनाने शिवसेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. आता राज्यात व पालिकेत शिवसेना सत्तेत असल्यामुळे सेनेने पुन्हा एकदा जोर लावला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापि शिवसेनेच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. या पाश्र्वभूमीवर महापालिकेत सेनेने ‘थिम पार्क’चा प्रस्ताव मांडल्यानंतर सेना-भाजपत जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत.