विवाहबंधनात असताना किंवा विवाहबंधनातून मुक्त झाल्याच्या एक वर्षांच्या आत झालेले मूल हे औरसच असते, असा निर्वाळा देत पतीने पत्नी व १६ वर्षांच्या मुलीच्या डीएनए व रक्तचाचणीची केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पत्नीचे आपल्याच एका नातेवाईकाशी अनैतिक संबंध होते आणि त्यातूनच तिला मुलगी झाल्याचा आरोप करत याचिकाकर्त्यां पतीने पत्नी, मुलीसह आपल्या या नातेवाईकाच्या डीएनए व रक्तचाचणीची मागणी केली होती. मात्र न्यायमूर्ती साधना जाधव यांनी पतीची ही मागणी फेटाळून लावली. १९९४ मध्ये याचिकाकर्त्यांचा विवाह झाला होता. परंतु र्मचट नेव्हीमध्ये नोकरीला असल्याने तो सतत घराबाहेर असायचा. सप्टेंबर ते डिसेंबर १९९६ या काळात तो पत्नीसोबत राहत होता. त्यानंतर जून १९९७ मध्ये त्यांना मुलगी झाली. परंतु सततच्या वादांमुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस पत्नीने देखभाल खर्चाची मागणी केल्यानंतर आपण या मुलीचे पिताच नाही, असा दावा केला. तसेच आपण या मुलीचा खरा पिता नाही, असे जाहीर करावे अशी मागणी सांगली न्यायालयात केली. परंतु ही मागणी फेटाळण्यात आल्याने त्याने उच्च न्यायालयात याचिका केली होती.