“कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय चीन कधीही मान्य करणार नाही. चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू होईल”, अशी अपेक्षा फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केली होती. तसेच, मेहबुबा मुफ्ती यांनी देखील नजरकैदेतून सुटका झाल्यावर  कलम ३७० हटवण्याबाबत वक्तव्यं केलेलं आहे.  यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या दोघांवर निशाणा साधला आहे.

“फारुक अब्दुल्ला असो की मेहबुबा मुफ्ती, जर कुणी भारतीय राज्यघटनेला आव्हान देण्यासाठी चीनची मदत घेण्याची भाषा करत असतील, तर त्यांना अटक करून दहा वर्षांसाठी अंदमानात पाठवावे. ते मुक्तपणे कसे काय फिरू शकतात?” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- पुणे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू, बाळासाहेब असताना तो मुंबईत होता – संजय राऊत

या अगोदर, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तिरंगा ध्वजाबद्दल केलेल्या विधानावरून संजय राऊत यांनी मुफ्ती यांच्यावर निशाणा साधला होता. “ जर मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला आणि अन्य लोकं चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करू इच्छित आहेत. तर, केंद्र सरकारला कडक पावलं उचलायला हवीत. कोणताही व्यक्ती जो काश्मीरमध्ये तिरंगा फडकवू इच्छित आहे, त्याला रोखलं जात असेल तर मग मी तो राष्ट्रदोह मानतो.” असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- संजय राऊतांकडून देवेंद्र फडणवीसांचं जाहीर कौतुक, म्हणाले…

१४ महिने स्थानबद्धतेत राहिल्यानंतर बाहेर पडलेल्या पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आपल्या हातातील जम्मू-काश्मीरचा झेंडा दाखवत, ‘जोपर्यंत हा झेंडा परत येत नाही तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही असं म्हटलं होतं. ”जोपर्यंत आम्हाला आमचा झेंडा परत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताच झेंडा फडकवणार नाही. आमचा झेंडाच तिरंग्याबरोबरच आमच्या संबंधांचा मुख्य दुवा होता.”, असं मुफ्ती म्हणाल्या होत्या.