संदीप आचार्य 

मुंबईत गेले काही दिवस सातत्याने करोना रुग्णांची संख्या वाढत असून मुंबईत करोना रुग्णांना बेड मिळणं त्यातही अतिदक्षता विभागात जागा मिळणं हे महादिव्य होऊन बसले आहे. यातील गंभीर बाब म्हणजे मुंबईतील पंचतारांकित रुग्णालयातच बेड हवा असा अट्टाहास असलेल्या रुग्णांना आज या रुग्णालयात जवळपास बेड उपलब्ध नाहीत. गंभीर बाब म्हणजे मुंबईतील सर्व रुग्णालयात मिळून आजच्या दिवशी अतिदक्षता विभागात केवळ ७८ बेड रिकामे असून यातील बहुतेक बेड हे पालिकेच्या जम्बो रुग्ण व्यवस्थेत उपलब्ध आहेत.

मुंबईत गेले काही दिवस दोन हजाराच्या आसपास करोना रुग्ण आढळत असून कोमॉर्बिड म्हणजे मधुमेह व उच्चरक्तदाबासह विविध आजार असलेल्या पन्नाशीपुढील बहुतेक रुग्ण हे खाजगी पंचतारांकित रुग्णालयात बेड मिळावा यासाठी प्रयत्नशील असतात. मुंबईतील नगरसेवक आमदार एवढेच काय अनेक मंत्रीही पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांना दूरध्वनी करून हिंदुजा, लीलावती, अंबानी अशाच रुग्णालयात बेड मिळवून देण्यासाठी आग्रह करत असतात. मुंबईतील बीएसइएस, बॉम्बे हॉस्पिटल, बीपीटी, ब्रीच कँण्डी, फोर्टिज, ग्लोबल, गुरुनानक, कोकीलाबेन अंबानी, प्रिन्स अलीखान आदी मोठ्या रुग्णालयात आजच्या दिवशी एकही बेड करोना रुग्णांसाठी उपलब्ध नसल्याचे महापालिकेच्या डॅशबोर्डवर दिसते.

लीलावती रुग्णालयात १४ बेड, हिंदुजा रुग्णालयात ६ बेड, नानावटी १० बेड, वोकहार्ट २ बेड, हिरानंदानी रुग्णालयात दुपारपर्यंत ४ बेड करोना रुग्णांसाठी शिल्लक असल्याचे दाखवत होते. मात्र यातील बहुतेक पंचतारांकित रुग्णालयात अतिदक्षता विभागात एकही बेड उपलब्ध नसल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

मुंबईत करोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर आता बेड मिळण्यासाठी रुग्णांची धावपळ सुरु झाली असली तरी महापालिका रुग्णालये तसेच पालिकेने निर्माण केलेल्या अद्ययावत जम्बो रुग्णालयात बेड शिल्लक आहेत. अर्थात येत्या काही दिवसांत रुग्ण वेगाने वाढल्यास पालिकेच्या केईएम, शीव व नायर रुग्णालयात बेड मिळणे शक्य होणार नाही, असे एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. पालिकेच्या डॅशबोर्डवर केईएम रुग्णालयात आज एकही बेड शिल्लक नसल्याचे दिसते.

मुंबईतील ५१ करोना रुग्णालयात १२,८७० बेड असून यातील ३७१२ बेड रिकामे आहेत. अतिदक्षता विभागात एकूण १७५० बेड असून आज दुपारपर्यंत यातील ७८ बेड शिल्लक होते. करोना झालेल्या डायलिसीस व कॅन्सर रुग्णांसाठी १७७ बेड असून यातील ५९ बेड रिकामे आहेत. यातील बहुतेक बेड हे पालिकेच्या वरळी डोम, बीकेसी, नेस्को, मुलुंड व दहिसर येथील जम्बो व्यवस्थेत शिल्लक आहेत. वांद्रे बीकेसी फेज एक व दोन मध्ये अनुक्रमे ८०५ व १५६ बेड रिकामे आहेत. याशिवाय वरळी डोम येथे २३१,दहिसर येथे २३९,सेव्हन हिल्स मध्ये २४७, गोरेगाव नेस्को जम्बो व्यवस्थेत १४७० बेड रिकामे आहेत. याशिवाय जीटी, कामा आदी रुग्णालयांत मिळून ३७१२ बेड आजच्या दिवशी रिकामे आहेत. तथापि करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आगामी काळात मुंबईतही करोना रुग्णांना बेड मिळण्यासाठी यातायात करावी लागेल अशी भीती लोकप्रतिनिधी तसेच काही डॉक्टरांनी व्यक्त केली.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल म्हणाले की, “मुंबईत आजही पुरेसे बेड आहेत तसेच महापालिका रुग्णालये व जम्बो रुग्ण व्यवस्थेत सर्वोत्तम उपचार मिळत असताना खासगी रुग्णालयात बेड मिळत नाही म्हणून बेड नसल्याची ओरड केली जात आहे. महापालिकेने करोना चाचण्यांची संख्या अडीचपट वाढवली असून आता १६ हजार करोना चाचण्या करण्यात येत असल्यानेच दोन हजार रुग्ण दिसून येतात. महापालिकेच्या जम्बो रुग्णालयात सर्वोत्तम उपचार व्यवस्था व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयातील मृत्यू दर हा महापालिका रुग्णालयांपेक्षा जास्त असल्या”चे आयुक्त चहल म्हणाले. “महत्वाचे म्हणजे रुग्णवाढ होऊ शकते हे गृहित धरून आमची पर्यायी योजना तयार आहे. ७३ छोट्या रुग्णालयातील २००० बेड व अतिदक्षता विभागातील ३०० बेड आम्ही अद्यापि ताब्यात घेतलेले नाहीत. गरज भासल्यास हे बेड करोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देता येतील. आणखी महत्वाचे म्हणजे नेस्को व मुलुंड येथे येत्या दोन दिवसात अतिदक्षता विभागात २५४ बेडची नव्याने व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या गतीने रुग्ण वाढत राहिले तरी मुंबईत आमच्याकडे चार हजार बेड व अतिदक्षता विभागात २५० बेड शिल्लक असतील” असे आयुक्त चहल यांनी सांगितले. लोकांनी पंचतारांकित रुग्णालयांचा आग्रह न धरता पालिका रुग्णालयात दाखल व्हावे व लोकप्रतिनिधींनीही एकदा जम्बो व्यवस्था किती दर्जेदार आहे ते पाहावे असे आवाहन आयुक्तांनी केले.