‘बीट द हीट’ या उपक्रमाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार

रस्त्यावर फिरणारे भटके श्वान आणि मांजरींची तहान भागविण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील प्राणी संस्थेतर्फे रस्त्याच्या कडेला, दुकानांजवळ, झाडांजवळ मातीची भांडी ठेवली जात आहे. दर दिवशी हे पाणी स्थानिकांकडून बदलले जाते. यामुळे, भटके श्वान, मांजर, पक्षी यांची तहान स्वच्छ पाण्याने भागवली जात आहे.

रस्त्यावर फिरणाऱ्या श्वानांना, मांजरींना हक्काचे घर तर नसतेच मात्र त्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेले पिण्याचे स्वच्छ पाणीही उपलब्ध होत नाही. हे प्राणी नाले, सांडपाणी किंवा साचलेल्या डबक्यातील पाणी पिऊन आपली गुजराण करतात. यातून प्राण्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. या प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वेगवेगळ्या प्राणी संस्था काम करीत आहे.

‘बीट द हीट’ या उपक्रमाअंतर्गत स्वयंसेवी संस्था पुढे येऊन दरवर्षी उन्हाळ्यात वेगवेगळ्या भागात पिण्याची भांडी ठेवतात. ‘आतापर्यंत आमच्या संस्थेने ७०० माती-सिमेंटची भांडी ठेवली आहेत. त्यात पाणी भरण्याची जबाबदारी स्थानिक पार पाडतात,’ असे ‘प्लॉन्ट अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी’चे (पॉझ)संस्थापक निलेश भणगे यांनी सांगितले. तर भटक्या श्वानांसाठी काम करणाऱ्या ‘इन डिफेन्स ऑफ एनिमल’ या संस्थेने सात वर्षांत साधारण ८ हजार मातीच्या भाडय़ांचे मोफत वाटप केले आहे.

संस्थेने पहिल्या वर्षी संकेतस्थळावर याबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर स्थानिक प्राणीप्रेमी आपल्या भागातील भटक्या श्वानांसाठी भांडय़ांची मागणी करू लागले. भांडय़ात नियमित पाणी भरण्याची जबाबदारी घेतल्यानंतर त्या भागात पाण्याचे भांडे पाठविले जाते. मुंबईतील घाटकोपर, दादर, कांदिवली या भागात तर वसई, विरार येथे प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची भांडी ठेवण्यात आली आहेत, असे ‘इन डिफेन्स ऑफ एनिमल’ या संस्थेच्या समन्वयक शर्मी भट यांनी सांगितले. या भांडय़ांचा भटक्या श्वानांबरोबर मांजरींनाही चांगला फायदा होतो. प्राण्यांबरोबरच पक्ष्यांचीही तृष्णा या पाण्यामुळे शमते. सिमेंट आणि मातीची ही भांडी धारावी आणि कांदिवलीतील कुंभारांकडून बनवून घेतली जातात. पण, अनेकदा आपल्या घराशेजारी प्राणी जमू नये म्हणून पाण्याची भांडी मुद्दाम फोडली जातात. कधी भांडय़ांची चोरीही होते, असा अनुभव ‘अ‍ॅनिमल मॅटर टू मी’ या संस्थेचे गणेश नायक यांनी सांगितला. गेल्या सहा वर्षांत मालाड, अंधेरी, कुलाबा या भागात पाच हजारांहून अधिक पिण्याची भांडी प्राण्यांकरिता ठेवण्यात आली आहेत.

नागरिकांना आवाहन

आपल्या भागातील श्वान, मांजरी आणि इतर प्राण्यांसाठी हे भांडे हवे असल्यास त्यांनी या संस्थांशी संपर्क साधावा. ९८१९३८०३१०/९८२०१६१११४.