मुंबई : समुद्रातून किनाऱ्यावर आणि रस्त्यावर वाहून येणारा कचरा साफ करण्याकरिता महापालिकेला दररोज तीन लाख रुपये खर्च करावा लागतो. उच्च न्यायालयाने नुकतीच या प्रश्नावरून पालिकेला खडे बोल सुनावत हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करणार, अशी विचारणा केली होती.

नद्या-नाल्यांमधून आणि मलनिसारण वाहिन्यांमधून समुद्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्यातील कचरा भरतीवेळी पुन्हा किनाऱ्यांवर येतो. मरिन ड्राइव्ह, वरळी, वांद्रे, गिरगाव, दादर-माहीम, जुहू, वर्सोवा, गोराई अशा किनाऱ्यांवर पावसाळ्यात तब्बल २०० टनांहून अधिक कचरा गोळा होत असून वाळूच्या किनाऱ्यांची स्वच्छता ठेवण्यासाठी पालिकेला दिवसाला तीन लाख रुपयांहून अधिक खर्च करावे लागतात.

शहराला लांबच लांब किनारा लाभला असला तरी रोज दोन वेळा येणाऱ्या भरतीमधून प्रचंड प्रमाणात कचरा जमिनीवर येतो. पावसाळ्यात हे प्रमाण काही पटींनी वाढते. यात प्रामुख्याने प्लास्टिकचा कचरा असतो. मोठय़ा भरतीच्या वेळी हा ढीग साफ करण्यासाठी पावसाळ्यात संबंधित विभाग अधिकाऱ्यांकडून अधिकचे सफाई कर्मचारी नेमले जातात. या वेळी १२ ते १६ जुलैदरम्यानच्या मोठय़ा भरतीवेळी मरिन ड्राइव्ह ते गोराईदरम्यानच्या किनाऱ्यांवरून दररोज तब्बल २२५ मेट्रिक टनहून अधिक कचरा उचलण्यात आला.

मरिन ड्राइव्ह येथून ११ टन, गिरगावहून ४ टन, दादर-माहीम येथून ६५ टन, जुहू येथून तब्बल ९० टन तर वर्सोवाहून २५ टन आणि गोराई येथून १५ टन कचरा रोज उचलला गेला.

गिरगाव, दादर-माहीम, जुहू-वर्सोवा या किनाऱ्यांवरील वाळूउपसा कमी करून केवळ कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेने कंत्राटदार नेमले आहेत.

त्यासाठी महापालिका प्रत्येक किनाऱ्यावरील कचऱ्याच्या प्रमाणानुसार पैसे खर्च करत आहे, अशी माहिती घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

जुहू

जुहू किनाऱ्यावर पावसाळेतर दिवसांत २० टन कचरा गोळा होतो. पावसाळ्यात हेच प्रमाण तब्बल १२५ टनांवर जाते. त्यामुळे या किनाऱ्यासाठी पालिकेने सहा वर्षांसाठी २४ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. म्हणजेच एका दिवसासाठी १ लाख १० हजार रुपये खर्च केले जातील.

वर्सोवा

वर्सोवा या साडेचार किलोमीटर लांबीच्या किनाऱ्याचे स्वच्छतेचे कंत्राट संपले आहे. पूर्वी या किनाऱ्यावर कचऱ्याचे प्रमाण कमी (५ टन) होते. मात्र गेल्या काही वर्षांत या किनाऱ्यावर पावसाळ्यात रोज तब्बल १३५ टन तर पावसाळातर दिवसांत ४५ टनांपर्यंत कचरा गोळा होतो. या किनाऱ्यासाठी याच महिन्यात कंत्राट दिले गेले असून सहा वर्षांसाठी २३ कोटी रुपये म्हणजेच दिवसाला १ लाख १५ हजारांहून अधिक खर्च येईल.

दादर-माहीम

दादर-माहीम या पाच किलोमीटर किनाऱ्यासाठीही पालिकेने जूनमध्ये कंत्राटदार नेमला होता. या किनारपट्टीवर पावसाळ्यात दर दिवशी सुमारे ४५ टन कचरा गोळा होतो, तर पावसाळ्यानंतर १२ टनांपर्यंत कचरा रोज उचलावा लागतो. यासाठी पालिकेने सहा वर्षांसाठी १२ कोटी रुपयांचे म्हणजेच दिवसाला सरासरी ५० हजार रुपयांचे कंत्राट दिले होते.