गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील मालवणीमधून ‘गायब’ असलेले तीन तरूण आयसिसमध्ये सामील झाल्याची शक्यता मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अयाज सुलतान, मोहसिन शेख आणि वाजिद शेख अशी या तरुणांची नावे आहेत. ‘मिड-डे’ने पोलिसांमधील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
आयसिसच्या जाळ्यात फसलेल्या पुण्यातील एका तरुणीचे समुपदेशन गेल्याच आठवड्यात पुणे पोलिसांकडून करण्यात आले होते. या तरुणीला फूस लावणाऱ्या एका तरुणाला जयपूरमध्ये अटकही करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर या तीन तरुणांचे आयसिसमध्ये सहभागी होण्याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या तिन्ही तरूणांनी वेगवेगळी कारणे देत गेल्या दोन महिन्यांच्या काळात घरे सोडले आहे. त्यानंतर त्यांचा आपल्या कुटुंबीयांशी कसलाच संपर्क नाही.
तीन तरुणांपैकी अयाज सुलतान यांने देश सोडल्याची शक्यताही दहशतवादविरोधी पथकाने व्यक्त केली आहे. मात्र, वाजिद आणि मोहसिन यांच्या ठाव ठिकाण्याबद्दल कोणतीही माहिती नाही. वाजिद शेख हा कुटुंबीयांचाच व्यवसाय सांभाळत होता तर मोहसिन शेख हा मुंबईत रिक्षाचालक म्हणून काम करत होता.
गेल्या काही महिन्यांपासून हे तिघेही पैशांची बचत करत होते आणि देशाबाहेर जाण्यासाठी त्यांनी एका ट्रॅव्हल एजंटशीही संपर्क केला होता, अशी माहिती मिळाली आहे.