महिला पोलीस जखमी; एकाला अटक, दोन आरोपींचा शोध सुरू

मुंबई पोलिसांवर नागरिकांकडून हल्ले होण्याच्या घटना सुरूच आहे. रविवारी सात दिवसांच्या गणेश विसर्जनादरम्यान एका मंडळातील कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात घडली. या दगडफेकीत एक महिला पोलीस जखमी झाली. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून दोन फरारी तरुणांचा शोध सुरू आहे.

बोरिवली परिसरातील चिंचपाडा येथील गावदेवी मित्र मंडळाचे कार्यकर्ते गणेश विसर्जनासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आले होते. स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलातील जवानही या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होते.

रात्री १० वाजण्याच्या सुमारास मंडळातील कार्यकर्ते गणेश विसर्जनासाठी तलावाजवळ आले असता, पोलिसांनी गणेशमूर्ती तलावात उभ्या असलेल्या जीवनरक्षकांकडे देण्यास सांगितले. यावर मंडळातील कार्यकर्त्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना पाण्यात जाण्यास विरोध कायम ठेवल्याने या तरुणांनी पोलिसांना शिवीगाळीस सुरुवात केली आणि दगडफेकही केली यात प्राजक्ता दहिबावकर ही महिला पोलीस जखमी झाली तर विसर्जनासाठी आलेले चंद्रकांत सुतार हे जखमी झाले. दोघांनाही कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी या तिघांना पकडण्यासाठी धाव घेतली असता तरुण पळू जाऊ लागले. संदेश सुतार (२७) याला पोलिसांनी पकडून अटक केली आहे.

गणेशभक्ताचा बुडून मृत्यू

रविवारी गणेशमूर्तीचे विसर्जन करीत असताना पवई येथे राहणाऱ्या एका गणेशभक्ताचा बुडून मृत्यू झाला. महेश गौडा (२७) असे या गणेशभक्ताचे नाव आहे. पवईतील पवारवाडी येथील गणेश विसर्जन घाट येथे महेश रात्री १२.३० दरम्यान गणेश विसर्जनासाठी गेले होते. विसर्जन करीत असताना ते पाण्यात बुडाले. अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना तलावातून बाहेर काढून तातडीने हिरानंदानी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, दाखल करता क्षणीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.