धकाधकीच्या जीवनात नोकरी आणि करिअरच्या जोडीला घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना महिलांची तारेवरची कसरत होत असते. अनेकदा बदलीमुळे किंवा बाहेरील गावात नोकरीमुळे अनेकांना आपल्या कुटुंबाला सोडून राहावे लागते. अशा वेळी आपल्या मुलांच्या पालकत्वावर त्याचा परिणाम होत असतो. मुलांना केवळ सुट्टीच्या दिवशीच आपण त्यांना वेळ देतो, पण त्याच वेळात आपल्याला घरातील इतर जबाबदाऱ्याही असतात. आपल्यासारखे जगात इतर अनेक जण असतील ते अशा वेळी काय करतात ते त्यांच्या मुलांचा सांभाळ कसा करतात असे विविध प्रश्न आपल्याला पडतात. या प्रश्नांची उत्तरे आणि उत्तम मातृत्व करण्याच्या टिप्स http://www.mycity4kids.com/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

आयआयएम बेंगळुर येथून व्यवस्थापनात पदवी शिक्षण घेतल्यानंतर तेरा वष्रे विविध कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव असलेले विशाल गुप्ता, व्यवस्थापन पदवीधर प्रशांत सिन्हा यांची भेट अविवा कंपनीत काम करत असताना झाली. या दोघांनाही आपल्या मुलांचे पालन करत असताना आपण त्यांना कमी वेळ देत असल्याचे जाणवले. मुलांचे पालनपोषण करण्याची प्रक्रिया ही यापूर्वी आपल्याकडे आजी-आजोबांपासून सुरू व्हायची. मात्र विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या पालनातील आजी-आजोबांची भूमिक संपुष्टात आली. मग ही जबाबदारी पूर्णपणे आईवर आली. मात्र आईदेखील नोकरी करणारी असल्यामुळे तिही किती आघाडय़ा सांभाळणार हा प्रश्न कायम आहेच. यातूनच या दोघांना पालकत्वावर एखादी सेवा सुरू करण्याची संकल्पना सुचली आणि त्यांनी काम केले. त्यांच्यासोबत आयआयटीयन आसिफ मोहम्मदही या प्रकल्पात सहभागी झाली. या तिघांमध्ये एक समान धागा म्हणजे तिघांनाही दोन मुले आहेत. यामुळे या प्रश्नाची गांभीर्यता या तिघांकडेही होती. मग या सेवांना जोडण्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि या संकेतस्थळाची निर्मिती झाली.

हे संकेतस्थळ म्हणजे देशभरातील मातांसाठीचे एक समाज माध्यमच असल्याचे म्हणता येईल. या संकेतस्थळावर मम्मी ब्लॉगर्ससाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात संकेतस्थळावर लॉगइन केलेली कोणतीही आई आपले अनुभव लिहू शकते. या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखे असते. हे अनुभव दुसऱ्या मातांना उपयुक्त ठरतात. सध्या संकेतस्थळावर एक हजारहून अधिक ब्लॉगर्स असून त्यांचे आठ हजारहून अधिक ब्लॉग्ज प्रसिद्ध झाले आहेत. या संकेतस्थळामध्ये लहान मुलांना सेवा देणाऱ्या विविध बडय़ा ब्रँड्सह ७५ हजारहून अधिक लहान कंपन्यांच्या माहितीचा समावेश आहे. या कंपन्यांची माहिती केवळ जाहिरात स्वरूपात नसून ती महिलांच्या अनुभवातून आलेली असते. अशी माहिती लिहिण्यासाठी महिलांना काही प्रमाणात मानधनही दिले जात असल्याचे संस्थापक विशाल गुप्ता सांगतात. याशिवाय संकेतस्थळावर लहानमुलांसाठी उपुयक्त असे लेख लिहिण्यासाठी कंपनीने काही संपादकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांकडूनही लेख लिहून घेऊन त्याचा वेगळा विभाग संकेतस्थळावर देण्यात आल्याचे विशाल यांनी नमूद केले. याशिवाय संकेतस्थळावर अशा प्रकारची माहिती देणारे पहिली व्हीडिओ वाहिनी सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातूनही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे विशाल यांनी सांगितले.

गुंतवणूक आणि उत्पन्न स्रोत

कंपनी सुरू करण्यासाठी सुरुवातीला तिघाही सह संस्थापकांनी ५० लाखांचा निधी उभा केला. यानंतर २०१२मध्ये त्यांनी निधी उभारणीसाठी पहिली फेरी पार पाडली. तर नुकतीच त्यांनी निधी उभारणीची दुसरी फेरी पार पडली. कंपनीने या माध्यमातून ३.५ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केला आहे. या संकेतस्थळांच्या माध्यमातून विविध ब्रँड्सची जी जाहिरात होते त्यासाठी कंपन्यांकडून पैसे घेतले जातात, हे या कंपनीचे मुख्य उत्पन्न आहे.

भविष्यातील वाटचाल

भविष्यात कंपनी देशातील आणखी काही शहरांमध्ये आपला विस्तार करणार असून लवकरात ते प्रादेशिक भाषांमध्ये संकेतस्थळ सुरू करणार आहेत. याची सुरुवात हिंदीपासून होणार असल्याचे विशाल यांनी नमूद केले. याचबरोबर व्हीडिओ वाहिनीच्या माध्यमातून  लोकांपर्यंत पोचण्याचाही कंपनीचा मानस असल्याचे विशाल म्हणाले.

नवउद्यमींना सल्ला

कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी तुम्ही उत्साही असणे गरजेचे आहे. याचबरोबर संयम असणे गरजेचे आहे. यशासाठी शॉर्टकट मारता काम नये. काही वेळ जाऊ दिल्यावर तुम्हाला यश मिळेल, असा सल्ला विशाल यांनी दिला आहे.

नीरज पंडित

Twitter : @nirajcpandit