कळव्याच्या भुसार आळीतील अन्नपूर्णा या अधिकृत इमारतीवर दोन मजल्याचे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्यामुळे ती पडल्याची बाब समोर येताच खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने शहरातील अशा इमारतींचा शोध सुरू केला आहे.
अन्नपूर्णा या इमारतीचे दोन मजले अधिकृत होते. मात्र त्यावर अधिक दोन मजल्याचे वाढीव अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याने तो भार इमारत पेलवू शकली नाही आणि ती कोसळली, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. शहरातील अनेक अधिकृत इमारतींवरही अशाच प्रकारे वाढीव मजल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या इमारतींवर वाढीव मजल्याचा भार वाढल्याने त्या धोकादायक होऊ शकतात. याच पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील अशा इमारतींचे वाढीव मजल्याचे बांधकाम पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भात महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत सविस्तर माहिती दिली.
 ठाणे शहरात अधिकृत इमारतींवर वाढीव मजल्याचे अनधिकृत बांधकाम करण्यात आलेल्या सुमारे १५० ते २०० इमारती असल्याची माहिती महापालिकेच्या रेकॉर्डवरून उपलब्ध झाली असून त्या इमारतींचे वाढीव मजल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असे संकेतही आयुक्त गुप्ता यांनी दिले. गरिबी तसेच आर्थिक कुवत नसल्यामुळे रहिवाशांनी अनधिकृत इमारतींमध्ये घरे घेतली. पण, या संधीचाही काही लोकांनी फायदा करून घेतला आहे. तसेच पुनर्वसन योजनेसाठी काही इमारती धोकादायक ठरविण्याचा प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अशांना बाजूला ठेवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ग्रामपंचायतीच्या काळात जी घरे उभारण्यात आली आणि ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले नाही, अशा रहिवाशांना घरे दुरुस्ती करण्याची परवानगी देण्यात येईल, असे आयुक्तांनी  स्पष्ट केले. या परवानगीचा गैरवापर केल्यास दुरुस्तीचे काम बंद करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
येत्या तीन महिन्यांत निर्णय
ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावाची सूचना, लक्षवेधीवर ठराव मंजूर करण्यात येतात. पण, त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. या संदर्भात, प्रशासनाकडे आलेल्या प्रस्तावावर संबंधित अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊन तो विषय महासभेच्या मान्यतेसाठी आणण्यात येईल, असे आयुक्तांनी  स्पष्ट केले.