अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला.. असे म्हणत कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितेतील कोलंबसाने समुद्राला आव्हान दिले होते. प्रत्यक्षात मात्र ‘शिखर किंवा समुद्र कधीच सर किंवा काबीज करायचे नसतात, तर त्यांच्यासोबत जगायचे असते’ असा जीवनाविषयीचा नम्र दृष्टिकोन लोकसत्ता कार्यालयात संपादकीय विभागातील कर्मचाऱ्यांना मंगळवारी अनुभवायला मिळाला! जीवनाविषयीचा हा दृष्टिकोन शिडाच्या होडीतून एकटय़ाने अवघा समुद्र उल्लंघून पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारे कमांडर दिलीप दोंदे आणि लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला मंगळवारी दिलेल्या भेटीदरम्यान मांडला. पृथ्वीप्रदक्षिणा करून सुखरूप परतलेल्या या दोघांनी कोणत्याही वर्तमानपत्राच्या कार्यालयाला दिलेली ही पहिलीच भेट होती.
अ‍ॅडमिरल आवटी यांनी २००८मध्ये या सागर परिक्रमेची कल्पना मांडली आणि कमांडर दिलीप दोंदे व लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांच्या आयुष्याला जणू कलाटणीच मिळाली. २००९-१०मध्ये पहिल्यांदाच सागर परिक्रमा करून कमांडर दोंदे परत आले. या परिक्रमेत लेफ्टनंट कमांडर अभिलाषकडे दोंदे यांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी होती. दोंदे यांची परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर लेफ्टनंट कमांडर अभिलाष यांनी न थांबता ही सागर परिक्रमा पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी कमांडर दोंदे यांनी त्यांना सर्वतोपरी साहाय्य तर केलेच; पण त्याचबरोबर आपल्या अनुभवाचे बोलही सांगितले.
पर्वताएवढय़ा उंच उसळणाऱ्या लाटा, भिरभिरणारा वादळी वारा आदी वर्णने एरवी फक्त गोष्टीच्या पुस्तकांत वाचायला मिळतात. पण ती प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या या दोघांनी संपूर्ण परिक्रमेदरम्यानचा थरार आपल्या गप्पांतून जिवंत केला. एकटय़ाने सागर परिक्रमा करताना अनेकदा थकव्यामुळे, झोप न झाल्याने दृष्टिभ्रम होण्याची शक्यता असते. ती टाळण्यासाठी मिळेल तेवढा वेळ झोप घेणे आवश्यक, असे सांगताना लेफ्टनंट कमांडर अभिलाष यांनी काही थरारक किस्से ऐकवले. या संपूर्ण काळात तुमची होडी ही तुमची सखी बनते. तिच्याबरोबर तुम्ही खूप गप्पा मारता. तुमची सुखदु:खे तिच्याचकडे बोलता, तिचीच सोबत असते सतत.. कमांडर दोंदे यांनी खलाशी आणि बोटीचे नाते नेमक्या शब्दांत मांडले.
सागर परिक्रमेदरम्यान दिसलेल्या निसर्गाच्या विविध चमत्कारांचेही त्यांनी वर्णन केले. निळा समुद्र आणि क्षितिजावर टेकलेले लालबुंद सूर्यबिंब हा सूर्यास्ताचा देखावा आजही आठवतो, असे लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांनी सांगितले.
‘लोकसत्ता’चे आभार !
सागर परिक्रमेचा ‘लोकसत्ता’ आणि ‘लोकप्रभा’मध्ये प्रसिद्ध होणारा वृत्तान्त आपल्याला मायदेशातील हजारोंशी जोडून ठेवत होता. कधी त्या वृत्तान्तामधून प्रेरणा घेऊन कुणी एखादी जाणीवजागृती मोहीमही हाती घेतल्याचे इंटरनेटच्या माध्यमातून कळत होते.. हे सारे आमच्यासाठीही प्रेरणादायीच होते, असे सांगत कमांडर दोंदे आणि लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांनी ‘लोकसत्ता’चे आभार मानले!