शीव-पनवेल महामार्गावर खारघर-कामोठेदरम्यानच्या टोलनाक्यावर टोलवसुलीला सुरुवात करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याठिकाणी होणाऱ्या वाहतूककोंडीचा विचारच केला नव्हता. प्रशासनाच्या या नियोजनशून्यतेमुळे वाहनचालकांना टोलचा भरुदड बसलाच पण त्याचबरोबर वाहतूक कोंडीमुळे वेळही वाया गेला.  खारघर येथील टोलनाक्यातून स्थानिकांना सवलत मिळेल की नाही, मात्र टोलवसुली करताना होणारी वाहतूककोंडी ही पनवेलकरांसाठी व या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. या मार्गाचे काम कामोठे, खारघर, कळंबोली येथे अर्धवट आहे, तरीही या मार्गाच्या पथकराच्या वसुलीची सुरुवात केल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांना पाच मिनिटांत कामोठे ते खारघर जाण्याची सवय होती त्या सवयीला मुरड घालत अनेकांनी अर्धा तास या रांगेत घालवला. अनेकांनी टोलची पावती फाडूनही वाहनांच्या बेशिस्त रांगेत अर्धा ते पाऊन तास काढला.

मनसेची मोडतोड
या टोलवसुलीविरोधात मनसेच्या ३५ ते ४० कार्यकर्त्यांनी कामोठे टोलनाक्याचे तीन बुथ फोडले. येथून खारघर टोलधाडीला विरोध सुरू झाला. शेकापनेही टोलवसुलीविरोधात गुरुवारपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आयुक्तांना टोलमाफी
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद हे पोलिसांच्या एका कार्यक्रमासाठी पनवेलमध्ये येण्यासाठी निघाले. या मार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका त्यांना बसू नये म्हणून त्यावेळी खारघर टोलनाक्यातून सरसकट वाहने सोडण्यात आली.

टोलच्या ‘त्या’ आश्वासनाचे काय झाले? – काँग्रेस</strong>
सत्तेवर आल्यावर टोल रद्द करू किंवा नव्या टोलनाक्यांची भर पडणार नाही, या निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असा सवाल खारघरमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या टोलच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने भाजपला केला आहे. टोलच्या मुद्दय़ावर काँग्रेसला रामराम ठोकून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजप सरकारने टोल सुरू केल्यावर ठाकूर गप्प का, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. टोलवसुली ठेकेदाराचे भाजपला एवढे प्रेम का आले? या ठेकेदाराचे आणि भाजपचे काही लागेबांधे आहेत का, असेही
प्रश्न उपस्थित केले आहेत.