कमी आवक व दर्जामुळे खाद्यपदार्थामध्ये वापर बंद; ‘मॅकडोनाल्ड्स’च्या बर्गरमधूनही हद्दपार

राज्यातून तसेच परराज्यातून येणारी टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे दर वाढले असतानाच आता उपाहारगृहांतील खाद्यपदार्थामधूनही या फळभाजीला सुट्टी मिळण्याची चिन्हे आहेत. बंगळूरु येथून येणारे टोमॅटो चांगल्या प्रतीचे नसल्याने ‘मॅकडोनाल्ड्स’ या नामांकित साखळी रेस्टॉरंटने बर्गरमध्ये टोमॅटोचा वापर तात्पुरता बंद केला आहे. अन्य उपाहारगृहेही हाच कित्ता गिरवण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवडय़ापासून मुंबई व उपनगरात टोमॅटोची आवक निम्म्याहून कमी झाली आहे. वाशीतील कृषी उत्पन्न बाजारपेठेत टोमॅटोचा पुरवठा कमी व मागणी जास्त असल्यामुळे दरवाढ करण्यात आली आहे, असे येथील विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या पाश्र्वभूमीवर आता उपाहारगृहांनीही टोमॅटोच्या वापरात हात आखडता घेण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात ‘मॅकडोनाल्ड्स’मधून झाली आहे. या ब्रॅण्डचे मुंबईत २५ ते ३० स्वतंत्र रेस्टॉरंट आहेत. यामध्ये विविध प्रकारचे बर्गर उपलब्ध असतात. यात सॅन्डविचप्रमाणे बर्गरच्या आत न शिजवता टोमॅटोचा वापर केला जातो. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या टोमॅटोची आवश्यकता असते. मात्र बाजारात येणारा टोमॅटो चांगल्या प्रतीचा नसल्याने बर्गरमध्ये याचा वापर सध्या केला जात नाही, असे ‘मॅकडोनल्ड्स’च्या कर्मचाऱ्याने सांगितले. या रेस्टॉरंटमध्ये तसे सूचनाफलकच लावण्यात आले आहेत.

उपाहारगृहात टोमॅटोचा वापर भाज्यांमधील रस्स्यासाठी केला जातो. तर टोमॅटो सूप, सॅलड यांसाठी टोमॅटोचा प्रामुख्याने वापर केला जातो. त्यामुळे ग्राहकाला सॅलडमध्ये टोमॅटोऐवजी कांदा, काकडी व गाजर दिला जातो, असे मुलुंड येथील ‘लंच होम’चे मालक गौतम जैन यांनी सांगितले. मात्र गेला महिनाभरापासून भाज्यांच्या किमती कडाडल्याने उपाहारगृहांवर त्याचा परिणाम होत आहे, असेही ते म्हणाले. तर गोदरेज कंपनीच्या ‘नेचर बास्केट’ या रिटेल स्टोअरच्या संकेतस्थळावर चांगल्या प्रतीचा टोमॅटोच उपलब्ध नाही. त्यामुळे बुधवारी दुपारी २ वाजताच त्यांच्या संकेतस्थळावर ‘सोल्ड आऊट’ असे नमूद करण्यात आले होते. ‘दोन अंडय़ांच्या भुर्जीसाठी एक मोठा टोमॅटो वापरला जातो. मात्र गेल्या आठवडय़ापासून बाजारात छोटे कमी प्रतीचे टोमॅटो ८० रुपये प्रति किलोने विकले जात आहेत. त्यामुळे भुर्जीत कांद्याचा वापर वाढवून टोमॅटोचा वापर कमी केला’, असे नरिमन पॉइंट येथील विक्रेता दीपक कदम यांनी सांगितले.

भाज्यांनंतर आता..

किरकोळ बाजारात वांगी, भेंडी, फरसबी, फ्लॉवर, टोमॅटो यांच्या किमती प्रतिकिलोमागे ८० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. तर कोथिंबिरीच्या जुडीमागे ६० ते ८० रुपये आणि एक किलो हिरव्या वाटाण्यासाठी २०० रुपये आकारले जात आहेत. ‘बंगळूरुहून येणाऱ्या टोमॅटोच्या मालाचा दर्जा चांगला नाही आणि हा माल फार काळ टिकून राहू शकत नाही. टोमॅटोची मागणी जास्त आहे, परंतु उपलब्धताच नसल्याने कमी प्रतीचा टोमॅटो मोठय़ा किमतीत विकला जात आहे, असे भायखळा येथील भाजी असोसिएशनचे सदस्य किरण झोडगे म्हणाले.