चार-पाच महिन्यांत विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे राज्याच्या पर्यटन महामंडळाला आरक्षणाच्या माध्यमातून चांगल्या महसुलाची प्रतीक्षा असतानाच ‘करोना’ संसर्गाचा फटका बसणार आहे. त्यामुळे आता मे महिन्यात होणाऱ्या अतिथिगृहातील खोल्यांच्या आरक्षणाकडे महामंडळाचे लक्ष आहे.

एप्रिल आणि मे या सुट्टय़ांच्या काळात महामंडळाच्या अतिथिगृहांना चांगला प्रतिसाद मिळतो. त्यातूनच प्रामुख्याने महसूल मिळतो. तो यंदा प्रथमच दुप्पट होण्याची शक्यता होती. अशातच ‘करोना’ संसर्गाचा कहर सुरू झाल्याने आतापर्यंत महामंडळाने आरक्षण वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न फुकट जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामंडळाच्या संकेतस्थळाला प्रथमच पाच ते चार तारांकित श्रेणी मिळू लागली होती. याचा फायदा उठविण्याचा महामंडळाकडून पुरेपूर प्रयत्न केला जात होता. मात्र ‘करोना’ संसर्गाचा कहर सुरू झाल्यानंतर या प्रयत्नांना खीळ बसली आहे.

महामंडळाच्या राज्यातील अतिथिगृहात आठशे ते नऊशे खोल्या आहेत. महाबळेश्वर, माथेरान, कार्ला आदी ठरावीक परिसर वगळले तर महामंडळाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अभिमन्यू काळे यांनी सर्वप्रथम अतिथिगृहातील खोल्या, तेथील कर्मचारी आणि खानपान सेवेचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू केला. वाचनालय, स्थानिक खेळ सुरू केले. पहिल्यांदाच पर्यटकांना आरक्षणामध्ये आपसूक उच्चतम श्रेणीची (अपग्रेड) सोय उपलब्ध करून दिली. म्हणजे क दर्जाची खोली आरक्षित केली आणि आरक्षणाच्या दिवशी ब वा अ श्रेणीतील (ज्यांचे दर अधिक आहेत) खोल्या रिक्त असल्यास क श्रेणीच्या दरातच ब वा अ श्रेणीची खोली उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. कंत्राटदारांकडील रेस्तरॉं स्वत: चालविण्यास घेतले. तब्बल १२ ठिकाणी अशी रेस्तरॉं सुरू झाली. महामंडळाला त्यातून ९६ लाखांचा नफा झाला. आतापर्यंत ही रेस्तरॉं तोटय़ातच होती. पर्यटकांच्या उत्तम प्रतिक्रियाही मिळत होत्या. आरक्षणाची पद्धतही सोपी करण्यात आली होती. त्यामुळे यंदा दुप्पट प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता असतानाच ‘करोना’मुळे फटका बसणार असल्याचे महामंडळानेही मान्य केले आहे.