मालवणी विषारी दारूकांडा प्रकरणी अटकेत असलेला आरोपी आतिक खान याने गुजराथहून मागवलेल्या रसायनाचा एक पिंप गुन्हे शाखेने मस्जिद बंदर येथील गोदामातून जप्त केला आहे. चोरटय़ा मार्गाने तो या रसायनांची वाहतूक करत होता.
या प्रकरणात गुन्हे शाखेने एकूण ९ आरोपींना अटक केली आहे. गुजराथहून मिथेनॉईल हे रसायन पुरविणारा व्यापारी किशोर पटेल आणि ती गुजराथहून मुंबईत आणून विकणाऱ्या आतिक खान यांचा त्यात समावेश आहे. आतिक ही रसायने पटेलकडून घेतल्यानंतर मोटारीतून मुंबईत आणायचा. या रसायनाची पिंपे मस्जिद बंदर येथील एका गोदामात ठेवली जायची.
पहाटेच्या वेळी जकात चुकवून ही पिंपे मालवणीत आणली जात होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी शनिवारी या गोदामावर छापा घालून एक रसयनाचे पिंप जप्त केले आहे. यातील रसायनाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. आतिक गुजराथमध्ये जाऊन राहुल नावाने वावरत असे.
त्यामुळे त्याने मागविलेल्या रसायनाच्या पिंपावर राहुल हे नाव लिहिलेले आढळून आले आहे. रसायने पुरविणारा व्यापारी गुजराथमधील वापी, सिल्वासा, अहमदाबाद आदी शहरातून लाच देऊन रसायनाचे पिंप आणत होता. गुन्हे शाखेचे पोलीस ज्या कारखान्यातून पिंपे आणली त्याचा आता शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.