गेले दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्याबाप्पाला आज थाटामाटात मुंबई-पुण्यासह राज्यभरात निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यासाठी त्या त्या ठिकाणच्या प्रशसनाने कडेकोट व्यवस्थ केली असून, संपूर्ण यंत्रणाही सज्ज आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी, गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी रविवारी दुपारपासून मध्य आणि दक्षिण मुंबईत लाखो भाविक गर्दी करतील. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास आणि घातपाती कृत्य करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यास पोलीस दल सज्ज असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी शनिवारी दिली. विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (२३ सप्टेंबर) शहरातील ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

५३ रस्ते वाहतुकीसाठी बंद –

वाहतुकीच्या नियमनासाठी ३,१६१ पोलीस आणि १,५७० ट्रॅफिक वॉर्डन सज्ज असतील. ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, वांद्रे येथील बडा मस्जिद, जुहू चौपाटी, गणेश घाट (पवई) या ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. १८ रस्त्यांवर मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी आहे. तसेच ९९ ठिकाणी सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास बंदी आहे. रविवारी दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंदीचे नियम लागू राहतील.

कसा असेल बंदोबस्त? –

५० हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्तावर
फोर्स वन, शीघ्र प्रतिसाद दलातील सशस्त्र कमांडो तैनात
राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात
पोलिसांच्या मदतीला बॉम्ब शोधक – नाशक पथक, श्वान पथक
लालबागच्या राजाचा मिरवणूक मार्ग, गिरगाव चौपाटीवर ड्रोन
रोड रोमिओंवर साध्या वेशातील पोलीसांची नजर

नवी मुंबई महापालिका प्रशासनानेही सर्व २३ विसर्जन तलावांवर यंत्रणा सज्ज ठेवली आहे. स्वयंसेवकांची फळी तयार करण्यात आली आहे. पोहता येणाऱ्या स्वयंसेवकांचीही प्रत्येक तलावांवर नियुक्ती केली आहे. ऐरोली कोपरखैरणेकडून वाशी शहरात येणारी वाहने ब्ल्यू डायमंड सिग्नल चौकातून कोपरी मार्गे पामबीच रोडवरून इच्छित स्थळी जातील. वाशी रेल्वेस्थानक, तसेच वाशी हायवेवरून मुंबई बाजूकडून वाशी शहरात येणारी वाहने वाशी प्लाझा हायवे बसस्टॉपच्या पुढे डावीकडे वळण घेऊन पामबीच मार्गे महात्मा फुले चौक, अरेंजा सर्कल, कोपरी सिग्नलकडून इच्छित स्थळी जातील.
वाशी सेक्टर ९, १०, ११, १२ कडून मुंबई व वाशी रेल्वेस्थानकाकडे जाणारी वाहने महानगरपालिका हॉस्पिटल समोरून जुहुगाव सेक्टर ११ ब्ल्यू डायमंड सिग्नल चौकातून कोपरी सिग्नल मार्गे रोडवरून इच्छित स्थळी जातील.

कोपरखैरणे, कलश उद्यान चौक, सेक्टर-११ ते वरिष्ठा चौक सेक्टर-२० कोपरखैरणेमध्ये नो पार्किंग.  सिरॉक प्लाझा प्लॉट नंबर २६, २७ व २८ सेक्टर-१९ ए ते स्मशानभूमी खाडीकिनारी प्रवेशबंदी. गणेश दर्शन सोसायटी प्लॉट नंबर २३३ सेक्टर-१९ ए कोपरखैरणे ते श्री गणेश विसर्जन तलाव सेक्टर-१९ ए मध्ये नो पार्किंग

गणेशमूर्तींचे विसर्जन काळोख असलेल्या ठिकाणी करू नका, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. कारण अशा ठिकाणी कुठलीही व्यवस्था नसते. त्यामुळे पाय घसरून पडण्याची किंवा चोरीसारख्या घटना घडण्याची शक्यता असते. विसर्जन स्थळी अतिरिक्त तराफे, बोटी, जीवरक्षक तैनात आहेत. स्टील प्लेट्स, मोटरबोट, प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, तात्पुरती शौचालये, जर्मन तराफा, सर्च लाइट, स्वागत कक्ष आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही पालिकेने केली आहे. गिरगाव, दादर, माहिम, जुहू, मार्वे आदी ठिकाणच्या चौपाट्यांवर, तसेच गोराई जेट्टी, पवई तलाव, भांडुपेश्वर कुंड, पूर्व द्रुतगती महामार्गावरचे मोरया उद्यान तलाव, तसेच सायन तलाव इत्यादी ठिकाणी पालिकेने विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे. समुद्रकिनारी स्टिंग रे, जेली फिश, वाम या माशांचा धोका असून, या माशांचा गणेशभक्तांना दंश होऊ नये, म्हणून महापालिकेने चौपाटीवर जाताना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करा, असे आवाहनही केले आहे.