मुंबई : पसंतीच्या वाहिन्या निवडता येत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) हॅथवे डिजिटल, डेन नेटवर्क, इंडसइंड मीडिया अँड कम्युनिकेशन, सिती नेटवर्क्‍स, फास्टवे ट्रान्समिशन, जीटीपीएल हॅथवे या मल्टी सिस्टम चालकांना (एमएसओ) ५ दिवसांत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश दिले आहेत.

१ फेब्रुवारीपासून ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या वाहिन्या निवडण्याचा पर्याय मिळाला असून देशाच्या काही भागांमध्ये अजूनही ग्राहकांना एकेक वाहिनी निवडता येत नाही. नाइलाजाने आणि काही ठिकाणी जबरदस्तीने पॅकेजच घ्यावे लागत आहे. काही ठिकाणी सशुल्क वाहिन्यांच्या प्रसारणामध्ये अडथळा, फक्त नि:शुल्क वाहिन्याच दिसणे अशा ग्राहकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत ट्रायने एमएसओंना दणका दिला आहे. त्याचबरोबर प्रत्येक एमएसओ कंपनीच्या बाबतीत स्वतंत्रपणे ग्राहकांच्या काय तक्रारी आहेत, त्या जाणून घेऊन ट्रायने त्यांना ५ दिवसांत तक्रार निवारण करण्याचे आदेश दिले आहेत.

ग्राहकांना हव्या त्या वाहिनी निवडता याव्यात, याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी ट्राय जातीने लक्ष घालत असून येणाऱ्या तक्रारी पूर्णपणे सोडवण्यावर ट्रायचा भर आहे, असे ट्रायचे सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले.