ब्रिटिश आमदानीत मुंबईमध्ये मोठय़ा दिमाखाने धावत असलेल्या आणि आता केवळ जुन्या मराठी कथा-कादंबऱ्यांतच दिसणाऱ्या ट्राम गाडय़ा आता लवकरच ठाण्याची शान बनणार आहेत. ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकालात काढण्याच्या दृष्टीने महापालिकेने शहरात द्रुतगती महामार्गालगत, आनंदनगर ते घोडबंदर या भागात ‘लाइट रेल ट्रान्स्पोर्ट’ (एलआरटी) सुरू करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे, तर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर ट्रामगाडय़ाही सुरू करण्यात येणार आहेत.
या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे ठाणेकराचे पैसे आणि वेळ यांची बचत होईल, तसेच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण यांची डोकेदुखीही कमी होईल, असा दावा महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी केला आहे. येत्या वर्षभरात प्रकल्प पूर्ण होईल, असा दावाही राजीव यांनी केला. येत्या १५ दिवसांत एका खासगी संस्थेची निवड करून त्या संस्थेच्या माध्यमातून
या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल
तयार करण्यात येईल. सुमारे ४० ते ४५ दिवसांत अहवाल आल्यानंतर
निविदा प्रकियेतून संस्थेची निवड करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, असे राजीव म्हणाले.    
अशी असेल लाइट रेल्वे
* रेल्वेला सहा डबे
* एका डब्यात कमाल १५० प्रवासीक्षमता
* ताशी ४० किमी वेग
* एलआरटीची धाव : आनंदनगर ते घोडबंदर
* ट्रामची धाव : महत्त्वाच्या अंतर्गत रस्त्यांवर
* अपेक्षित खर्च : ८०० कोटी रुपये